
सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता नंदकुमार कोरे यांनी आपला राजीनामा मंगळवारी (ता. २ नोव्हेंबर) भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे सादर केला. त्यांचा राजीनामा ‘विहित नमुना’ पत्रावर येणार का, याविषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या. परंतु, त्यांनी लेटर हेडसह नमुना पत्रावर राजीनामा सादर करून पक्षाने दिलेला आदेश पाळला. (Sangli Zilla Parishad President Prajakta Kore resigns)
जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले,‘‘जिल्हा परिषद अध्यक्षांनी आज दुपारी माझ्याकडे राजीनामा सादर केला. त्यांनी लेटर हेड आणि विहित नमुना अशा दोन्ही पद्धतीने राजीनामा दिला आहे. उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, सभापती सुनीता पवार, जगन्नाथ माळी यांचा राजीनामा बुधवारी कोअर कमिटीच्या बैठकीवेळी मिळेल, असे अपेक्षित आहे. सभापती प्रमोद शेंडगे यांनी याआधीच राजीनामा दिला आहे.’’
ते म्हणाले, ‘‘भाजप कोअर कमिटीची महत्वाची बैठक बुधवारी होत असून त्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहे. त्यावेळी जिल्ह्यातील सगळेच नेते उपस्थित असतील. त्यांच्यासमोर जिल्हा परिषदेतील राजीनामे आणि पुढील भूमिकेविषयी चर्चा केली जाईल. त्यात शिक्कामोर्तब झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा या सभापतींचे राजीनामे मंजूर करून घेतील आणि त्यानंतर अध्यक्षांचा राजीनामा सादर केला जाईल.’’
भाजप नेते जी जबाबदारी देतील, ती प्रामाणिकपणे पार पाडणार
प्राजक्ता कोरे यांनी भावनिक आवाहन करणारे निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यात म्हटले आहे की, भाजपने मला जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. ती मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. कोरोना, महापुराच्या संकटात लोकांसोबत उभी राहिले. सुविधा पोचवल्या. येथून पुढेही भाजप नेते जी जबाबदारी सोपवतील, ती प्रामाणिकपणे पार पाडली जाईल.
विहित नमुन्याची एवढी चर्चा का?
अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचा राजीनामा फक्त ‘लेटर हेड’वर दिला जाईल आणि तो विभागीय आयुक्तांकडे ग्राह्य धरला जाणार नाही, अशी कुजबूज सकाळपासून सुरु झाली होती. त्यामुळे संशयकल्लोळही माजला होता. अध्यक्षा कोरे यांनी मात्र साऱ्या चर्चा चुकीच्या ठरवत पक्ष नेत्यांच्या आदेशाचा मान राखला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.