महाराष्ट्रातील विधानसभा आमदारांना संभाजीराजेंचे खुले पत्र; म्हणाले...

महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे.
Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi news
Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi newsSarkarnama

पुणे : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून सहाव्या जागेसाठीच्या घडामोडींना वेग आला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) यांनी सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून प्रयत्न सुरू केले असून महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना (MLA) खुले पत्र लिहले आहे. दरम्यान शिवसेनेकडून (Shivsena) आपलाच सहावा उमेदवार असल्याचे स्पष्ट केल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे. (Rajya sabha election 2022 election update)

Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi news
राजकीय घडामोडींना वेग : संभाजीराजेंना शिवसेना प्रवेशाची अट; तरच राज्यसभेचे तिकीट!

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सहा जागा निवडून द्यायच्या आहेत. यात भाजपच्या दोन तर कॅाग्रेस, राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि शिवसेना यांचा एक उमेदवार पहिल्या मतांच्या कोटा घेऊन निवडून येऊ शकतात. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांचा प्रयत्न आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली उमेदवारी जाहीर केली होती. अपक्ष आमदारांनी आपल्याला सूचक आणि अनुमोदक म्हणून पुढे यावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी कॅाग्रेसने पाठिंबा दिल्याचा दावाही त्यांच्या गोटातून करण्यात आला होता. मात्र तसे घडणे आता शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे संभाजीराजेंना कोण पाठिंबा देणार, याची उत्सुकता आहे. भाजपनेही आपली अतिरिक्त मते कोणाला देणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे. आता आज पुन्हा संभाजीराजेंनी राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना आपल्याला समर्थन देण्यासाठी आवाहन केले आहे.

संभाजीराजेंचे खुले पत्र...

प्रति,

सर्व विधानसभा सदस्य,

महाराष्ट्र विधीमंडळ

आपणांस कल्पना आहेच की, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या ४२ मतांची आवश्यकता आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एक जागेकरिता कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. करिता, या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन मी सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केलेले आहे.

२००७ पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत मी राजकारण विरहित कार्य करीत आलो आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले.

Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi news
मोदींच्या काळातच महागाईनेही केली ऐतिहासिक उच्चांकी कामगिरी

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्र या विचारांवरून ढळू नये, यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत मी झटत राहिलो. जनकल्याणालाच नेहमी व एकमेव प्राधान्य दिले. मात्र हे सर्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी हाती सत्तापद असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदाकीच्या कारकिर्दीत माझ्या लक्षात आले. याचमुळे, राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करीत आहे. याकरिता मला आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे.

माझी कारकीर्द व प्रामाणिक कार्यपद्धती पाहता, आपण सर्वजण राज्यसभेच्या या सहाव्या जागेसाठी मला निश्चितच सहकार्य कराल, अशी जाहीर अपेक्षा सदर पत्रान्वये मी व्यक्त करतो, असे जाहीर आवाहन संभाजीराजेंनी केले आहे.

दरम्यान, शिवसेनेची सहाव्या उमेदवाराची तयारी असून महाविकास आघाडीकडे तीसच्या आसपास पहिल्या कोट्यातील मते आहेत. त्यामुळे आपण भाजप म्हणेल त्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी आपणच भाजपचा उमेदवार स्वपक्षात खेचून आणण्याचा सेनेचा प्रयत्न आहे. संभाजीराजेंनी तो प्रस्ताव मान्य केला नाही तर सेना कोणाला रिंगणात उतरविणार, याची उत्सुकताही आहे. कॅाग्रेसकडे दोनच अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे त्यांचा दुसरा उमेदवार रिंगणात नसेल. राष्ट्रवादीकडे 12 मते अतिरिक्त आहेत. तरीही राष्ट्रवादी कॅाग्रसने दुसऱ्या जागेवर हक्क सांगितलेला नाही. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप व्हाया संभाजीराजे असाच सामना या निवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळू शकतो. मात्र, राष्ट्रवादीने यातून अलगद अंग काढून घेतले आहे, असे निरीक्षण काही सूत्रांनी नोंदविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com