
Ahmednagar News : नगर जिल्ह्यात सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे राजकारणात जम बसवलेल्या मात्तब्बर नेत्यांचा ओढा वाढला असून शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरे (Uddhav Tahckeray) यांची शिवसेना नगर जिल्ह्यात उभारी घेण्याच्या तयारीत आहे.
भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय छल्लारे यांच्या नंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेत माजी मंत्री व भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे आणि काष्टीचे सरपंच साजन पाचपुते (Sajan Pachpute) येत्या 4 सप्टेंबर रोजी ठाकरेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश करत आहेत. यामुळे साजन पाचपुते यांनी आपल्या काकांची साथ सोडत वेगळा मार्ग निवडल्याची चर्चा होत आहे. (Latest Marathi News)
याबाबत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.शशिकांत गाडे यांनी तसेच साजन पाचपुते यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, येत्या 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शिवबंधन अर्थात पक्षप्रवेश सोहळा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री'वर पार पडणार आहे.
शंभरापेंक्षा अधिक चारचाकी गाड्यांचा ताफा, तालुक्यात पक्ष प्रवेशाची चर्चा, बॅनर्स आदी माध्यमातून साजन पाचपुते यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होतानाच, तालुक्यात याची दखल घेतली जाईल, याचे मोठे नियोजन केले जात असल्याचेही बोलले जात आहे.
या अनुषंगाने शिवसेना दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा.शशिकांत गाडे, श्रीगोंदा तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय कारले आदींच्या उपस्थितीत नगरमध्ये यावर मध्ये चर्चा झाली. जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार 2019 ला निवडून आलेला नाही.
शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे शिंदे गटात सामील झाले आहेत. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठी फूट पडली आहे. या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी नगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले असून बदललेल्या राजकीय परिस्थितीत आघाडीकडे असलेले काही मतदारसंघात अदला-बदल होऊ शकते. अशावेळी साजन पाचपुते यांचा ठाकरे शिवसेना पक्ष प्रवेश भविष्याची नवी नांदी देणारा ठरणार का? या दृष्टीने याकडे पाहिले जात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.