रोहित पवार-राम शिंदे एकाच मंचावर : ना एकमेकांकडे पाहिले... ना बोलले...

आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांच्यात सत्ता संघर्ष सुरू आहे.
रोहित पवार-राम शिंदे एकाच मंचावर : ना एकमेकांकडे पाहिले... ना बोलले...
Ram Shinde, Rohit PawarSarkarnama

राशीन ( जि. अहमदनगर ) - कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांच्यात सत्ता संघर्ष सुरू आहे. गुरूवारी ( ता. 14 ) हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसले. मात्र ते ना एकमेकांशी बोलले. ना त्यांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांच्यातील ही कटुता जिल्हाभर चर्चेचा विषय ठरत आहे. ( Rohit Pawar-Ram Shinde on the same stage: neither looked at each other ... nor spoke ... )

कर्जत-जामखेडचे नाव निघाले की आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचा विषय निघतोच. या दोघांच्या लढतीने राज्याचे लक्ष वेधले होते. छोट्या-मोठ्या निवडणुकीतही त्यांच्या भूमिकांकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागलेल्या असतात. शिंदे यांना पराभूत केल्यानंतर लगेच आमदार पवार यांनी त्यांच्या भेट देत खिलाडूवृत्ती दाखवली होती. त्याचीही राज्यभर चर्चा झडली. परंतु काल घडलेल्या प्रकाराने पुन्हा वेगळेच चर्वितचर्वण सुरू झालेय.

Ram Shinde, Rohit Pawar
कर्जतचे सत्ताकारण : रोहित पवार-राम शिंदे यांच्यातील स्पर्धेचा इंटर्व्हल संपला...

त्याचे असे झाले, आमदार पवार व राम शिंदे गुरुवारी ( ता. 14 ) राशीनमध्ये डॉ. आंबेडकर जयंतीनिमित आयोजित प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमाला सकाळीच उपस्थित राहिले. एकाचवेळी दोघांच्या हस्ते प्रतिमापूजनही झाले. मात्र, या दोघांनी चकार शब्दही उच्चारला नाही. एकमेकांकडे न पाहताच दोघांनी हा कार्यक्रम पार पाडला. अन् दोघे दोन दिशांनी निघून गेले. राजकीय जाणकार आणि निरीक्षकांच्या नजरेतून मात्र ही गोष्ट सुटली नाही.

राजकारणात हेवे-दावे, आरोप-प्रत्यारोप आणि हार-जीत होत असते. या गोष्टी केवळ राजकारणापुरत्याच मर्यादित असतात. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यातील राजकारणाने मात्र प्रचंड नाराजीचे टोक गाठले आहे. याचा प्रत्यय गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राशीनकरांनी आला.

Ram Shinde, Rohit Pawar
ही तर राम शिंदे यांची स्टंटबाजी : रोहित पवारांचा पलटवार

कर्जत-जामखेड मतदार संघात पवार आणि शिंदे यांच्यातील राजकारण सध्या अनेक कारणांनी राज्यभर गाजत आहे. कर्जत नगर पंचायतीची निवडणूक असो, विविध विकास कामांच्या मंजुरीचे श्रेय असो, कुकडीचे आवर्तन असो, रखडलेल्या उसाचे गाळप असो, कार्यकर्त्यांचे एकमेकांशी असलेले व जिल्हा पोलिस ठाण्यापर्यंत गेलेले 'सोशल वॉर' असो अथवा समाजमाध्यमांवरील आरोप-प्रत्यारोपाच्या सातत्याने झडणाऱ्या फैरी असो स्थानिक मंडळींना ही कारणे सर्वश्रूत आहेत.

पवार आणि शिंदे प्रथमत:च एका मंचावर सामाजिक कार्यक्रमानिमित एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र, दोघांच्या चुप्पीमुळे एकमेकांविषयी असेलली नाराजी, कटुता लपून राहिली नाही. येणाऱ्या काळात ही नाराजी अशीच वाढत जाणार की या दोघांमध्ये सलोखा होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Ram Shinde, Rohit Pawar
रोहित पवार म्हणाले, सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मोफत वकिली केली नाही...

सौहार्दाला सुरुंग

आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे हे राजकीय विरोधक असले तरी त्यांच्यात सौहार्दाचे वातावरण होते. एकमेकांच्या सुख-दुःखात ते सहभागी होत. दोघांनीही टीका करताना कधीच खालची पातळी गाठली नाही. भाजपनेत्यांबाबत अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना रोहित पवार खडसावतात. परंतु आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय. दोघांतील सौहार्दाला सुरुंग लागला आहे. कर्जत नगर पंचायतीच्या निवडणुकीपासून वातावरण दुषित व्हायला लागले आहे. पवार कुटुंबालाच या निवडणुकीत ओढण्यात आले. त्यावरूनच सध्या कर्जत तालुक्यात धूसफूस सुरू आहे. ती अशी राहिल्यास दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांत ती परावर्तीत होऊ शकते. अर्थात दोन्ही नेते संयमी आणि प्रगल्भ आहेत. त्यामुळे ही राजकीय कटुता लवकर संपेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.