संजयकाका पाटील म्हणाले, तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं...

खासदार संजयकाका पाटील (SanjayKaka Patil) यांचे वडिल आर. के. पाटील यांचे निधन
R K Patil ff
R K Patil ffsarkarnama

सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना आज पितृशोक झाला. त्यांचे वडील माजी डीवायएसपी आर. के. पाटील यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. आर. के. पाटील यांना सर्वत्र तात्या म्हणून ओळखले जात होते.

मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र वयोमानानुसार त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नसल्याने अखेर आज (सोमवारी) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. तात्यांनी अनेक वर्षे पोलिस दलात काम केले होते. डीवायएसपी या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. खासदार संजयकाका पाटील यांना घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

रामचंद्र कृष्णाजी पाटील म्हणजे तासगाव परिसरात आर. के तात्या नावाने परिचित असलेले व्यक्तिमत्व. पोलिस खात्यात दमदार कामगिरी करून आर. के. तात्या यांचे आज निधन झाले. चिंचणीच्या कृष्णाजी पाटलांना एकूण 6 अपत्ये. त्यापैकी रामचंद्र पाटील यांचा जन्म १६ जुलै १९३५ रोजी चिंचणी येथे झाला. तात्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचणी येथे झाले. माध्यमिक शिक्षण सांगली शिक्षण संस्थेच्या सिटी हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण विलिंग्डन काॅलेज सांगली येथे झाले. खेळ प्रकारात पारंगत असलेले तात्या अर्थातच कालेजचे चॅम्पियन होते. आणि यामुळेच त्यांनी नोकरीसाठी कायदा व सुव्यवस्था क्षेत्राची निवड केली आणि ती अगदी शेवटपर्यंत गाजवली.

बालपणीच आईवडिलांचे छत्र हरवल्याने ब-याच प्रतिकूल परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागले .पण प्रतिकुल परिस्थितीला पायदळी तुडवत त्यांनी आगेकूच केली. सावर्डेचे कुस्तीपटू पैलवान जोतीराम दादा पाटील यांची पुतणी व पैलवान संभाजी तात्या गोविंद पाटील यांच्या भगिनी कै.सौ वैजयंता यांच्याशी त्यांचा विवाह १९६२साली झाला. त्यांना सौ संगीता ,सौ सरिता सौ सविता आणि श्री संजय ही अपत्ये झाली. मुलांना चांगले संस्कार,शिस्त,आणि उत्तम शिक्षण दिले.

पोलीस सेवेत रुजू झाल्यावर त्यांची पहिली नियुक्ती मेढा (वाई) येथे झाली. यानंतर करमाळा, माळशिरस,सोलापूर,पंढरपूर, सांगली,कोल्हापूर, सातारा या वेगवेगळ्या ठिकाणी आपले कर्तृत्व गाजवले व शेवटी खंडाळा येथील प्रशिक्षण केंद्रावर कार्यरत असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. यामधील पंढरपूर येथील त्यांची कामगिरी विशेष गाजली. .

पोलिस क्षेत्रात काम करताना भल्याभल्यांना आस्मान दाखवणारे तात्या म्हणजे आमच्या चिंचणी गावाची शान होते. आजही पंढरपूर येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या एन्काऊंटरचा किस्सा प्रत्येकाच्या तोंडात असतो. पंढरपूर येथील लोक त्यांना संरक्षणासाठी माऊलींनी पाठवलेला दूत असे म्हणत. पोलिसी शिस्त आणि करारीपणा हा त्यांच्या नसानसात भरलेली होती. सेवानिवृत्तीनंतर सांगली येथील दादामहाराज केळकर यांचा अनुग्रह त्यांनी घेतला आणि शेवटच्या श्वासापर्यंत अध्यात्मात त्यांनी आपले जीवन व्यतीत केले.

खासदार संजयकाका पाटील यांच्या जडणघडणीत त्यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांनी आपली शिस्त व संस्कार आपल्या नातवंडामध्येही रुजवली. वयाच्या 87 व्या वर्षीही आपल्या मुलाच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतल्या होत्या. गावच्या समाजकारणात ते नेहमी सहभागी असतं.

वडिलांविषयी आपल्या भावना व्यक्त करताना संजयकाका म्हणाले की माझे वडील माझे मार्गदर्शक होते. माझ्या सामाजिक व राजकीय वाटचालीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. त्यांनी दिलेल्या संस्कारांनी व मूल्यांनी माझी जडणघडण केली. त्यांची उणीव पदोपदी आम्हाला भासत राहील. त्यांच असणं आमच्यासाठी सर्वस्व होत. ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होत, आता सर्व काही असण्याची जाणीव आहे पण, ते आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com