शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांची राजकीय आत्महत्या?

सातारा जिल्ह्यातील दोन्ही बंडखोरांपुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे गंभीर आव्हान.
Shambhuraje Desai & Mahesh Shinde
Shambhuraje Desai & Mahesh ShindeSarkarnama

सातारा : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडात सातारा जिल्‍ह्यातून पाटणचे आमदार व गृहराज्‍यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) सहभागी झाले आहेत. दोघांच्‍याही निर्णयामागे ‘राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारी अडचण’ याच करणाचा समान धागा आहे. (NCP`s hurdle is the common issue for Shivsena rebel MLA)

Shambhuraje Desai & Mahesh Shinde
राजकीय गणिते उलटसुलट होणार; बंडखोर आमदारांचे भवितव्य काय?

वास्‍तविक, शिवसेनेवर अवलंबून राहावं, अशी या दोन्‍हीही नेत्‍यांची परिस्‍थिती नाही. दोघेही शिवसेनेच्‍या तिकिटावर लढले असले, तरी आपापल्‍या मतदारसंघात स्‍वतःच्‍या ताकदीवर निवडून आलेले आहेत. महेश शिंदे हे तर मूळचे भाजप विचारांचेच आहेत. शिवसेना-भाजप युतीच्‍या जागावाटपात कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेकडे होता. म्‍हणून भाजपने शिंदे यांना शिवसेनेच्‍या तिकिटावर लढविले होते. त्‍यामुळे आगामी काळात त्‍यांनी भाजपमध्ये उडी घेतली तरी आश्‍चर्य वाटण्याचं कारण नाही. शंभूराज देसाई यांनी याआधीच्‍या निवडणुका शिवसेनेच्‍या चिन्‍हावरच लढल्‍या होत्‍या. पाटण तालुक्‍यात त्‍यांची स्‍वतःचीच एवढी ताकद आहे, की पक्षामुळे ते विजयी होतात असे नव्‍हे, तर त्‍यांच्यामुळे शिवसेनेला एक आमदार मिळतो, अशी स्‍थिती आहे.

Shambhuraje Desai & Mahesh Shinde
उद्धव ठाकरे सरकारचा फैसला उद्याच, राज्यपालांचे आदेश!

अशाप्रकारे दोघेही मातब्‍बर असल्‍यामुळे त्‍यांच्या बंडामुळे दोन्‍हीही मतदारसंघांत अपवाद वगळता तीव्र प्रतिक्रिया उमटलेली नाही. कोरेगाव मतदार संघात आधीपासूनच शिवसेनेची ताकद नगण्य आहे. शिंदे यांचे बहुतांश कार्यकर्ते हे काँग्रेस आणि राष्ट्रीवादीतून आलेले आहेत. त्‍यामुळे तेथे बंडखोरीच्‍या विरोधात प्रतिक्रिया येण्याचा प्रश्‍नच नाही. देसाईंची स्‍थितीही फारशी वेगळी नाही. मात्र, पाटण मतदारसंघातील जनतेचा मुंबईशी असलेला ‘कनेक्‍ट’ लक्षात घेता तिथल्‍या मूळ शिवसैनिकांमधून देसाईंच्‍या निर्णयावर नाराजी दिसून येते. उदरनिर्वाहासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात असलेल्या जनतेचे मतदान गावाकडे देसाईंना होत असते. त्‍यामुळे उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती असलेला यातील मोठा वर्ग आगामी निवडणुकांत देसाईंच्‍या विरोधात जाऊ शकतो. याचा फटका त्‍यांना येऊ घातलेल्या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकीतही बसू शकतो. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीतही त्‍यांचा विरोधी पाटणकर गट फायदा उठवू शकतो.

उट्टे काढण्याची संधी साधली

महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीकडून होणारी अडचण हेच या दोन्‍ही नेत्‍यांचे दुखणे आहे. कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्‍बर नेते शशिकांत शिंदे यांचा पराभव करून महेश शिंदे आमदार झाले. महाविकास आघाडीचे सरकार बनल्‍यावर राष्ट्रवादीने शशिकांत शिंदेंना विधान परिषदेवर घेतलं. त्‍यांच्या माध्यमातून कोरेगाव मतदारसंघासाठी निधी देणं सुरू ठेवलं. ही बाब महेश शिंदे यांना रुचणं शक्‍यच नव्‍हतं. शंभूराज देसाई यांचा काही दिवसांपूर्वी झालेल्या सातारा जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीत पराभव झाला. ही निवडणूक राष्ट्रवादीने सर्वपक्षीय नेत्‍यांना बरोबर घेऊन लढवली होती. भाजपचे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहकार्यातून बिनविरोध निवडून आले. आपल्‍यालाही संचालक पदावर राष्ट्रवादीने ‘ॲडजेस्ट’ करून घ्यावे, अशी शंभूराज यांची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही आणि त्‍यांना पराभव चाखावा लागला. राष्ट्रवादीला बँकेत भाजपचे खासदार-आमदार चालतात; मग शिवसेनेचा आमदार का चालला नाही, असा रोष शंभूराज यांच्या मनात होताच. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाच्‍या माध्यमातून हे स्‍थानिक उट्टे काढण्याची संधी देसाईंनी निवडली असावी, असे राजकीय जाणकार सांगतात.

लगेचच परिणाम नाही

बंड यशस्‍वी झाल्‍यास त्‍याचे स्‍थानिक राजकारणावर तातडीचे परिणाम होण्याची शक्‍यता दिसून येत नाही. अयशस्‍वी झाल्‍यास मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्‍ही मतदारसंघाचं ‘नॅरेटिव्ह’ बदलू

शकतं. पाटणमधील जनतेच्‍या मुंबई कनेक्शनमुळे देसाईंचा विजय आजच्‍या इतका सहजसोपा राहणार नाही, तर कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी शशिकांत शिंदेंसाठी ताकद लावण्यात किती यशस्‍वी होणार, यावर महेश शिंदे यांचे भवितव्‍य अवलंबून राहणार आहे. तात्‍पर्य, देसाई आणि शिंदे यांची राष्ट्रवादी हीच दुखरी नस आहे. त्‍यावर ते करून घेत असलेला बंडाचा इलाज मात्र त्‍यांना कोठे नेऊन ठेवणार, हे आगामी काळच ठरवेल.

सद्यःस्थिती

- बंडामुळे सातारा जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया नाही

- पाटणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विषयी सहानुभूती असलेला मोठा वर्ग

- आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का शक्य

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com