
कोरेगाव : कोरेगाव जुना मोटार स्टँडसमोर पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पोलिस उपनिरीक्षकाला दमदाटी करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विशाल अंकुश कदम असे मारहाण झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून अक्षय लालासाहेब पवार असे त्या गुन्हेगाराचे नाव आहे.
याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, कोरेगाव पोलिस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षक विशाल अंकुश कदम (वय ३२) हे शुक्रवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास पेट्रोलिंग करण्यासाठी कोरेगाव पोलिस ठाण्यातून खासगी वाहनाने जुन्या मोटार स्टँडसमोर गेले. तेथे त्यांना वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शनास आले.
त्यावेळी एक काळ्या रंगाची गाडी (एमएच ११ : एएफ १) सातारा बाजूकडे तोंड करून उभी होती. या गाडीच्या बाजूला अक्षय लालासाहेब पवार (रा. खंडोबाचा माळ, सातारा) आणि सराईत गुन्हेगार संकेत राजू जाधव (रा. कोरेगाव) हे दोघे आरडाओरडा करत होते. काळ्या रंगाची गाडी आणि पवार व जाधव यांच्यातील वादामुळे तेथे वाहतूक कोंडी झाली होती.
ही कोंडी सुटावी म्हणून पीएसआय कदम यांनी पवार आणि जाधव यांना सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालू नका. तुमची गाडी बाजूला घ्या, असे सांगितले. त्यावर पवार याने कदम यांच्याकडे पाहून "कदम साहेब ही गाडी माझीच आहे. डॉन परत कोरेगावला आला आहे. लोकांना कळू द्या.. असे ओरडून सांगितले. दोघांत वादावादी सुरू झाली. गाड्या बाजूला काढा अन्यथा मला तुमच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे पीएसआय कदम यांनी सांगितले.
त्यावर पवार याने श्री. कदम यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करत मारहाण केली. हा प्रकार सुरू असतानाच कोरेगाव पोलिस ठाण्यातील अंमलदार श्री. साळुंखे, पोलिस नाईक श्री. पवार, श्री. घाडगे, पोलिस कॉन्स्टेबल श्री. जाधव तेथे आले. यांनी बळाचा वापर करत पवारला पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी जाधव हा त्यांच्या गाडीतून पळून गेला. दरम्यान, याप्रकरणी कोरेगाव पोलिसांत अक्षय पवार व संकेत जाधव या दोघांवर भारतीय दंड विधान कलम ३५३, ३३२, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगावचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत अधिक तपास करत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.