रामदास कदमांना शिवसेनेने भरभरून दिलंय; सुनील शिंदेंची उमेदवारी योग्यच!

शिवसेनेत विधान परिषदेच्या उमेदवारीवरून कोणीही नाराज नाही : विनायक राऊत
रामदास कदमांना शिवसेनेने भरभरून दिलंय; सुनील शिंदेंची उमेदवारी योग्यच!
Vinayak Raut_Ramdas KadamSarkarnama

पंढरपूर : माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांना यापूर्वी शिवसेनेने (Shiv Sena) आमदार, विरोधी पक्षनेतेपद व मंत्रीपदासह भरभरून दिले आहे.‌ आता सुनील शिंदे यांना पक्षाने न्याय दिला आहे, तो योग्यच आहे. रामदास कदम यांचाही विचार होईल. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही, असे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी स्पष्ट केले. (No anyone upset in Shiv Sena over candidature of Legislative Council : Vinayak Raut)

खासदार विनायक राऊत हे शनिवारी (ता. 20 नोव्हेंबर) विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने आमदार कदम यांच्याऐवजी वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे यांना संधी दिली आहे.

सुनील शिंदे यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपली जागा सोडली होती. त्या वरळीतून आदित्य ठाकरे सध्या आमदार आहेत. आपल्यासाठी जागा सोडणाऱ्या शिंदे यांना न्याय देण्याची भूमिका विद्यमान पर्यावरण मंत्री ठाकरे आणि पर्यायाने शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे मुंबई विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेकडून विद्यमान आमदार रामदास कदम यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी शिंदे यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी देण्यात आलेली आहे.

वरळी मतदारसंघातून ज्यांचा पराभव करून सुनील शिंदे निवडून आले होते, ते राष्ट्रवादीचे नेते सचिन अहीर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनाही राजकीय पुनर्वसनाचा शब्द देण्यात आला होता. मात्र, या निवडणुकीतून त्यांनाही डावलण्यात आलेले आहे. तसेच, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टच्या बांधकामाबाबतची माहिती रामदास कदमांनीच किरीट सोमय्या यांना पुरविल्याचे सांगितले जात आहे. सध्या परब हे मातोश्रीच्या सर्वांत जवळचे समजले जातात. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगू लागली आहे. त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न खासदार विनायक राऊत यांनी पंढरपुरात बोलताना केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in