झेडपी अध्यक्षांनी सही करण्यापूर्वी फाईल अजित तळेकरांकडे जाते

भाजपच्या अनेक आजी-माजी आमदारांचे व नेत्यांचे पीए अध्यक्षांच्या दालनात वारंवार चकरा मारतात.
झेडपी अध्यक्षांनी सही करण्यापूर्वी फाईल अजित तळेकरांकडे जाते
Umesh Patil-Aniruddha KambleSarkarnama

सोलापूर : गुरांमध्ये आणि गोठ्यांमध्ये रमणारे अनिरुध्द कांबळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. सामान्य कुटुंबातून आलेल्या या व्यक्तीकडून सामान्यांची कामे होतील, अशी आमची अपेक्षा होती. कांबळे यांच्या काळात जिल्हा परिषद अध्यक्षांचे दालन हे टक्केवारीचे दालन झाले आहे. महत्वाच्या फाईलवर त्यांची सही होण्यापूर्वी ती फाईल करमाळा तालुक्यातील केमचे माजी सरपंच अजित तळेकर यांच्याकडे जाते, तळेकर यांनी ग्रीन सिग्नल दिल्यावरच त्या फाईलवर अध्यक्ष कांबळे सही करतात, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी केला आहे. (NCP's Umesh Patil makes serious allegations against Solapur ZP president)

सोलापुरातील सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष पाटील म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती निवडीच्या वेळी राष्ट्रवादीचे मतदान फोडण्यासाठी घोडेबाजार झाला होता. या घोडेबाजारात वापरलेली रक्कम साडेचार कोटी रुपये, तर नाही ना?, ही रक्कम वसूल करण्यासाठी जिल्ह्यातील भाजपचे आमदार आणि महत्वाचे नेते अध्यक्ष कांबळे यांच्यावर दबाव तर आणत नाहीत ना? असा आरोपही त्यांनी केला.

Umesh Patil-Aniruddha Kamble
अजित पवारांचा कारखाना चालविणारे वीरधवल जगदाळे प्राप्तीकर छाप्यानंतर म्हणाले...

जिल्ह्यातील भाजपच्या अनेक आजी-माजी आमदारांचे व नेत्यांचे पीए अध्यक्षांच्या दालनात वारंवार चकरा मारतात. रक्कम वसूलीसाठीच या चकरा असल्याचाही आरोप त्यांनी केला. ज्या निधीवरुन टक्केवारीचा आरोप झाला. तो निधी काही कालावधीसाठी स्थगित करावा. जिल्हा परिषद अध्यक्षांचे सह्यांचे अधिकार काढून घ्यावेत, अशी मागणी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करणार असल्याचेही कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले. या आरोपांसंदर्भात तळेकर यांच्याशी संपर्क साधला असता या विषयावर आपण योग्य वेळी प्रतिक्रिया देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Umesh Patil-Aniruddha Kamble
राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी गाठली गोविंद बाग!

अध्यक्षांच्या पीएवर गुन्हा दाखल करा

अध्यक्ष कांबळे यांच्या पीएवर गंभीर आरोप झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांनी तातडीने त्या पीएवर गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबित करायला हवे होते. जिल्हा परिषदेचा कर्मचारी जर टक्केवारी गोळा करण्याचे काम करत असेल तर या गोष्टी कशा खपवून घेतल्या जातात? सभापतींनाच जर टक्केवारी मागितली जात असेल तर सर्वसामान्यांचे हाल विचारायला नकोत, असा प्रश्‍नही कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी उपस्थित केला.

सोमवारी निर्णय घेणार : स्वामी

या विषया संदर्भात झेडपीचे अध्यक्ष अथवा सभापती यांच्याकडून पीएबद्दल रितसर तक्रार आलेली नाही. तरी देखील या संदर्भातील सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सोमवारी (ता. ११ आक्टोबर) या संदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.