शरद पवारांनी लक्ष घालताच राष्ट्रवादीतील पदाधिकारी बदलास स्थगिती

शरद पवार यांनी सोलापूर दौऱ्यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांना आपण निवडलेले पदाधिकारी योग्य आहेत का? असा सवाल केला होता.
NCP
NCP Sarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी बदलाचा वाद गोविंद बागेपर्यंत पोचल्यानंतर जिल्ह्याचे नेतृत्व खडबडून जागे झाले. आपणच नेमलेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्याची वेळ सोलापूरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यावर आली. मंगळवेढा राष्ट्रवादीत करण्यात आलेल्या पदाधिकारी बदलास अखेर साठे यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवारांचे मंगळवेढ्यावर असलेले लक्ष आजही कायम असल्याचे चित्र या निमित्ताने आधोरेखित झाले. (NCP's District president stayed appointment of new office bearers in Mangalveda)

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर नुकत्याच झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता आणि तालुक्यात राष्ट्रवादीचा तुल्यबळ गट असूनही अपेक्षित मताधिक्य देता न आल्याने भगिरथ भालके यांचा पराभव झाला. त्यानंतर तालुक्याच्या संघटनेत एक प्रकारची मरगळ आली होती. पक्षाच्या आढावा बैठकीत वरिष्ठांसमोर तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी तसे बोलून दाखवले होते. तसेच, सत्ता असताना कामे होत नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली होती. जबाबदार नेत्यांकडून म्हणावे तितके लक्ष दिले जात नसल्याची तक्रारही त्यावेळी करण्यात आली होती.

NCP
आबासाहेबांच्या निधनाने पोरक्या झालेल्या शेकापचा महाआघाडीच्या नेत्यांपुढे कस लागणार

जिल्हा नेतृत्व आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करणे अपेक्षित होते. पण, ठराविक पदाधिकाऱ्यांनी परस्पर त्यांच्या सोयीचे पदाधिकारी निवडले होते. त्यावरून मंगळवेढा राष्ट्रवादीत वाद पेटला होता. नियुक्त्या करताना आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत नगरपरिषदेतील पक्षनेते अजित जगताप, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य विजय खवतोडे, नगरसेवक प्रवीण खवतोडे, प्रशांत यादव, बशीर बागवान, जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते, शहराध्यक्ष संदीप बुरुकुल, भारत बेदरे, मुझम्मिल काझी, संजय पवार, ज्ञानेश्वर भगरे, सुनील डोके, दयानंद सोनगे, विठ्ठल आसबे, सोमनाथ बुरजे, शशीकांत साखरे, नजीर इनामदार, बंडू बेंद्रे, मिलिंद ढावरे, बसवेश्वर सोनगे यांनी शरद पवार यांची गोविंद बागेत जाऊन भेट घेतली होती. त्या वेळी जिल्हा राष्ट्रवादीत ठराविक पदाधिकाऱ्यांची मनमानी होत असल्याची तक्रार केली होती.

NCP
केंद्रीय तपास यंत्रणा महाआघाडीच्या नेत्यांना या कारणांमुळे त्रास देतात

दोन दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोलापूर दौरा झाला. त्या दौऱ्यात त्यांनी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांना आपण निवडलेले पदाधिकारी योग्य आहेत का? असा सवाल केला होता. त्यावेळी त्यांनी थोडी चूक झाली असल्याचे सांगताच पवारांनी या इतर पदाधिकाऱ्याच्या चर्चेतून सर्व निवडी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यानंतर नुकत्याच करण्यात आलेल्या निवडी पवार यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आल्या आहेत, त्याबाबचे प्रसिद्धीपत्रक जिल्हाध्यक्ष साठे यांनी काढले आहे. दोन गटांत विभागलेल्या राष्ट्रवादीला एकसंघ कसे केले जाणार आहे, याकडे मंगळवेढा शहर आणि तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in