
शिर्डी ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्ह्यातील भाजपची जबाबदारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी स्वतः कडे घेतली आहे. जिल्ह्यातील निम्म्या मतदार संघांवर एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. भाजपला जिल्ह्यात पुन्हा अच्छे दिन आणण्यासाठी फडणवीसांनी लक्ष देण्यास सुरवात केली आहे. तर या फडणवीसांच्या वादळाला परतवून लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही रणनीती तयार केली आहे. ( NCP's command and Fadnavis' strategy )
मागील विधानसभा निवडणुकीनंतर अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणावर राष्ट्रवादीने पुन्हा कमांड केली आहे. राज्यात मोठा झालेला भाजप येथे छोटा झाला. पुढील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन, पक्षाचा त्यावेळी मोडलेला डाव पुन्हा सावरण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी मांडमांड सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वतःकडे घेतली.
पहिल्या टप्प्यात कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवीत, विविध मुद्यांवर संघर्ष करण्याचे संकेत त्यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीत दिले. मागील अडीच वर्षांत जिल्ह्याच्या राजकीय पटलावरचे चित्र पुरते बदलले. राष्ट्रवादी काँग्रेसने नियोजनबध्द रणनीती आखीत आपल्या आमदारांना ताकद दिली. मंत्रीपदी विराजमान झालेले आमदार प्राजक्त तनपुरे, साईसंस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे आणि पारनेरचे आमदार नीलेश लंके हे त्याचे उत्तम उदाहरण.
दक्षिणेतून आमदार रोहित पवार यांचा उदय झाला. महाविकास आघाडी या नात्याने विचार करायचा झाल्यास, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेसपक्षातील स्थान आणि वजन आणखी वाढले. पक्षाच्या अनुभवी, ज्येष्ठ आणि जबाबदार नेत्यांत त्यांची गणना होतेय. शिवसेनेने शंकरराव गडाख यांना मंत्रीपद दिलेय. त्यामुळे राष्ट्रवादी बरोबरच महाविकास आघाडीचीदेखील शक्ती वाढली.
येथील राजकारणावर सहकार आणि साखरसम्राटांचा प्रभाव. त्यांच्या मतदारसंघात सहसा कुठल्याही लाटेचा प्रभाव जाणवत नाही. ते ब-याचदा स्वबळावर निवडून येतात. त्यामुळे यातील प्रभावशाली मंडळींना सोबत घेऊन भाजपने जिल्ह्यात बस्तान बसविले. जिल्ह्यातील सहकारातील नेते आमदार राधाकृष्ण विखे, शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, अकोल्याचे माजी मंत्री मधुकर पिचड, राहुरीचे माजी आमदार शिवाजी कर्डिले, नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा समावेश आहे. माजी मंत्री राम शिंदे हे एकमेव मूळ भाजपचे.
पराभवामुळे व्यूहरचनेला धक्का
मागील विधानसभा निवडणुकीत यातील भाजपचे तब्बल पाच आमदार पराभूत झाले. एका अर्थाने फडवणीसांच्या व्यूहरचनेला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यावर पुरती कमांड केली. त्यामुळे फडवणीसांनी पुन्हा मांडामांड सुरू केलीय. आता भाजपसमोर तीन विरूध्द एक असा सामना करण्याचे नवे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.