
Ahmednagar News: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणजे एक घाव दोन तुकडे. चांगले काम केले तर एखाद्याचे ते कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत. मात्र कुणी काही चुकीचे केले तर भरसभेत संबंधिताचे नाव घेऊन कानउघाडणी करण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत. त्यांच्या कामाचा झपाटा मोठा आहे.
कमी वेळात जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्याकडे त्यांचा कल असतो. त्यासाठी मोठी यंत्रणा कामास लावण्याची त्यांची हातोटी वाखणण्याजोगी आहे. अशा अजित पवारांना आज अहमदनगर जिल्ह्यातील नगर-पाथर्डी (राष्ट्रीय महामार्ग २२२) रस्त्याने चांगलेच दमविल्याचे दिसून आले.
पाथर्डी येथे महाविकास आघाडीतर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यास महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरम्यान शेतकरी मेळाव्यास जाताना त्यांना नगर-पाथर्डी रस्त्याने त्यांच्या वेगात अडथळा आणला. रस्त्यावरील खड्ड्यांनी पवारांच्या ताफ्याचा वेग मंदावला. रस्त्यावरील खड्डे चुकविताना ताफ्यातील चालकांना मोठी कसरत करावी लागली. त्यामुळे चालकांची दमछाक झाली.
अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नगर-पाथर्डी रस्त्यावर राडारोडा निर्माण झाला होता. रस्त्यातील खड्ड्यांत पाणी साचले होते. पाण्यामुळे चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. परिणामी ताफ्याचा वेग मंदावला. या मार्गावरून अजित पवारांचा ताफा जातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राज्यात या रस्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या मार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. या मार्गाचे काम पूर्ण होण्याच्या मागणीसाठी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी नगर-पाथर्डी रस्त्याबाबत माहिती दिली.
या रस्त्याचे काम २०१६ मध्ये मंजूर झाले होता. त्यावेळी हे काम जीडीसीएल कंपनीला दिले होते. ८२ कोटींचे निकृष्ट काम झाल्यानंतर खासदार म्हणून संबंधित ठेकेदाराला निलंबित केले. त्यानंतर दुसऱ्या ठेकेदाला कोरोनामुळे काम करता आले नाही. त्यानंतर पर्यावरणाच्या कारणामुळे २०२२ पासून काम रखडल्याची माहिती खासदार विखेंनी दिलेली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.