
Sanjay Raut On Government: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे विधीमंडळ नव्हे, तर चोरमंडळ असं विधान केलं आहे. यावरुन शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपनं चांगलंच रान उठवलं आहे. राऊतांवर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी भाजप शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 15 जणांची समिती स्थापन केलीय.
या समितीने राऊतांना नोटीस धाडण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर देण्याची मुदत शुक्रवारी (दि.३) संध्याकाळी संपत आहे. याचवरुन तुरुंगात टाकून झाले, आता फासावर लटकवणार असाल, तर लटकवा असं आव्हान शिंदे फडणवीस सरकारला दिलं आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कराडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हक्कभंग समितीच्या नोटिशीसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. राऊत म्हणाले, हक्कभंग नोटीस माझ्याकडे आलेली नाही. ती घरी पाठवण्यात आली आहे. मी नोटीस वाचलेली नाही. नोटीस घरी जाईन, कार्यालयात जाईन तेव्हा पाहीन. मी सध्या बाहेर आहे. एवढ्या घाईने उत्तर देता येत नाही. कायद्याचं राज्य असल्याने कायदेशीर उत्तर द्यावं लागेल. त्याला वेळ लागतो असंंही राऊत यावेळी म्हणाले.
तसेच सरकार बेकायदेशीर असल्याने सगळंच बेकायदेशीरपणे सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उद्देशून देशद्रोही असा उल्लेख केला. मी कोणत्याही प्रकारे आमदारांचा अपमान होईल असं वक्तव्य केलेलं नाही.
माझं वक्तव्य एका विशिष्ट गटासाठी उद्देशून होतं. त्यांना चोर म्हणतो. पक्षाचं नाव आणि चिन्हाची चोरी करुन आपलीच म्हणून सांगणं यावरुन ते वक्तव्य होतं. मी हे वक्तव्य बाहेर केलं आहे. अशा लोकांना अख्खा देश चोर म्हणत आहे. बच्चू कडूंना अशाप्रकारे म्हणून दाखवून दिलं आहे. तुरुंगात टाकून झालं, आता फासावर लटकवायचं तर लटकवा. तेवढंच बाकी आहे अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
“कालपासून त्यांना घाम फुटलाय...''
संजय राऊतांनी कसब्यातील पराभवावरून भाजपाला चिमटा काढला आहे. राऊत म्हणाले, “कालपासून त्यांना घाम फुटलाय. त्यामुळे इतर निवडणुका पुढे ढकलल्या जातील. त्यांची थोडीफार शिल्लक झोपही उडाली आहे. कसब्यात त्यांचा पराभव झालाच आहे. पण चिंचवडमध्ये त्यांचा विजय झालाय हे मी मानायला तयार नाही. आमच्यातलाच एक बंडखोर उभा करून मतविभागणी करण्यात त्यांना यश प्राप्त झालं. नाहीतर चिंचवडही कसब्याच्याच मार्गाने गेला असताअसं राऊत यांनी सांगितलं.
कोण संदीप देशपांडे? ते कोठे असतात?
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क येथे अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला आहे. यावर राऊत म्हणाले, कोण संदीप देशपांडे? ते कोठे असतात? अशी विचारणा करत त्यांनी असा कोणावरही हल्ला योग्य नसल्याचं संजय राऊत म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था नसल्याचा आरोपही केला आहे. राज्याचे गृहमंत्री निवडणूक असलेल्या भागात कायदा हातात घेऊन यंत्रणा राबवतात अशा शब्दांत राऊतांवर फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.