
सातारा : विधान परिषदेच्या निकालानंतर सध्या महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सु्रू झाले आहेत. यानिमित्ताने शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे १७ आमदारांसह नॉट रिचेबल झाले. त्यांच्यासोबतच्या आमदारांच्या यादीत कोरेगावचे आमदार महेश शिंदे व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचीही नावे असून हे दोघेही नॉट रिचेबल आहेत. महेश शिंदेंची नाराजी मान्यता करता येईल, पण, शिवसेनेने शंभूराज देसाईंना गृहराज्यमंत्री पद दिले होते. तेही एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी झाले, याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटत आहे. (Mahesh shinde News)
राज्यसभेच्या निवडणुकीतील यशानंतर भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीतही यश मिळवत आपल्या पाच जागा निवडून आणल्या. हे सर्व करताना शिवसेना व काँग्रेसची मते फोडण्यात त्यांना यश आले. या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नॉटरिचेबल झाले. ते शिवसेनेतील १७ आमदार घेऊन सुरतमध्ये गेल्याचे उडघ झाले.
१७ आमदारांमध्ये सातारा जिल्ह्यातील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. महेश शिंदे हे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेले होते. मात्र, भाजप युतीच्या जागा वाटपात कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. त्यामुळे महेश शिंदेंना शिवसेनेतून निवडणूक लढून राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदेंचा पराभव केला.
महेश शिंदे शिवसेनेचे आमदार झाल्यानंतर ही भाजपशी त्यांचे संबंध दृढच राहिले. तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक वाढली, यानिमित्ताने कोरेगाव मतदारसंघासाठी त्यांनी मंत्री शिंदेंच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात निधीही उपलब्ध करून घेतला आहे. महायुतीचे सरकार सत्ते आले असते तर महेश शिंदेंना मंत्रीपद मिळाले असते.
पण, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची युती होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यामुळे शिवसेनेत असूनही महेश शिंदेंना मंत्री पदाची संधी मिळाली नाही. कदाचित ते नवखा आमदार असल्याने असेल. पण ही सल त्यांच्या मनात होती. त्यातूनच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभाग घेतला असेल.
पण, शंभूराज देसाई हे शिवसेनेच्या चिन्हावर पाटणमधून आमदार झाले व त्यांना महविकास आघाडीत गृहराज्यमंत्रीपद मिळाले. त्यांची शिवसेना पक्षावर किंवा प्रमुखांवर कोणतीही नाराजी नव्हती. उलट शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सर्वात जवळचे होते. तरीही ते मंत्री एकनाथ शिंदेंसोबत बंडात सहभागी झाल्याचे चित्र आहे. सध्या ते नॉट रिचेबल असून एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांच्या यादीत त्यांचेही नाव आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष व शिवसेना पक्ष प्रमुखांशी लाडके असूनही शंभूराज देसाई यांनी बंडात सहभागी होण्याचा निर्णय का घेतला, याचे जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना आश्चर्य वाटत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.