महाडिक कुटुंबाने गेली काही वर्षे विजयाचा गुलाल उधळलाच नाही...आता तरी...!!!

Kolhapur politics : सतेज पाटील यांचा महाडिकांच्या सत्तेला सुरूंग!
महाडिक कुटुंबाने गेली काही वर्षे विजयाचा गुलाल उधळलाच नाही...आता तरी...!!!
Mahadik FamilySarkarnama

पुणे : कोल्हापूरचे बडे प्रस्थ असलेले माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे आता भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. कोल्हापूरच्या राजकारणात दबदबा असलेल्या या कुटुंबाची सध्या राजकीय पिछेहाट चालू आहे. त्यांची सारी राजकीय संस्थाने गृह राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी जिंकून घेतली आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत तरी महाडिकांना विजय मिळणार का, याची उत्सुकता आहे.

कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील (Satej Patil) आणि महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांच्यातील राजकीय स्पर्धा धनंजय महाडिक यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळणार आहे. राज्यसभा निवडणुकीत काही मते खरेदी करायची असल्याने महाडिक यांचा पर्याय भाजपने शोधला आहे. भाजप ही निवडणूक गंभीरतेने लढणार असेल तरच राजकीय उतरणीला लागलेली महाडिकांची गाडी सावरू शकेल. गेल्या सहा-सात वर्षातील बहुतांश सर्व निवडणुकांत महाडिकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाडिकांवर गुलाल पाडण्यासाठी भाजपा कसा प्रयत्न करणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Mahadik Family
मुख्तार अब्बास नक्वींचा पत्ता कट अन् केंद्रीय मंत्रिमंडळातूनही डच्चू?

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक महाडिक खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांनी भाजपकडून सतेज पाटील यांचा पराभव केला. हा पाटील यांच्यासाठी मोठा धक्का ठरला होता. महाडिक गटाची तेव्हा सरशी होत होती. महादेवराव महाडिक म्हणतील तोच शब्द कोल्हापूरात खरा होत होता. गोकुळ संस्था, जिल्हा बॅंक, महापालिका, जिल्हा परिषद येथे त्यांच्याच गटाचे प्राबाल्य होते.

विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी महाडिक यांना प्रथम रोखले. पालिकेची सत्ता पाटील यांच्याकडे आली. त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाडिक गटाला पहिला धक्का बसला. सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव करत राजकीय बदला घेतला. या धक्क्यानंतर महाडिक गटाच्या ताकदिला ओहोटी लागली. त्यातही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार अमल यांच्या पत्नी शौमिका या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बनल्या. हा तेवढाच गुलाल महाडिक गटावर उधळला गेला. त्यानंतर हा गट आणि महाडिक कुटुंब विजयाच्या प्रतिक्षेत आहे.

Mahadik Family
शिवसेनेच्या पवारांना कोल्हापूरचेच महाडिक देणार टक्कर; भाजपकडून उमेदवारी जाहीर

महाडिकांच्या सत्तेला दुसरा हादरा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बसला. सतेज पाटील यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना पाठिंबा देत धनंजय महाडिक यांचा पराभव केला. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर गोकुळच्या निवडणुकीत महाडिकांची तेथील सत्ता संपुष्टात आली. जिल्हा बॅंकेतही पाटील-मुश्रीफ जोडीचा बोलबाला राहिला.

पाटील हे एकेक सत्तास्थाने ताब्यात घेत असतानाच त्यांची विधान परिषद निवडणूक पुन्हा आली. या निवडणुकीत महाडिक विरुद्ध पाटील असा सामाना होण्याची शक्यता निर्माण झाली. भाजपने अमल महाडिक यांना उमेदवारीही जाहीर केली. पण काही घडामोडींमुळे महाडिक यांनी माघार घेतली. तेथेही पाटील यांनीच गुलाल उधळला.

गेल्या महिन्यात झालेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत महादेवराव महाडिक यांचे भाचे सत्यजित कदम यांचा पराभव झाला. त्यामुळे महाडिक यांना वारंवार पराभव पाहावा लागत आहे. आता यातून सुटका करून घेण्यासाठी राज्यसभेत विजय मिळविणे गरजेचे आहे. पण महाडिक यांची उमेदवारी गंभीरतेने आही की ते ऐनवेळी माघार घेणार, याचीही चर्चा आहे. सतेज पाटील यांच्या सत्तेला सुरुंग लावण्याची ते वाट पाहत आहेत. पण सध्या तरी फासे त्यांच्या बाजूने पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in