‘दामाजी’ची लढाई अर्ध्यावर सोडून आमदार आवताडेंनी मुंबईत ठाण मांडले!

सत्ता बदलाने येणाऱ्या मंत्रीमंडळात जिल्ह्यातून नव्या चेहऱ्याला की पुन्हा जुन्याला संधी मिळते, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
Samadhan Autade
Samadhan AutadeSarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीची रंगीत तालीम असलेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची लढाई अर्ध्यावर सोडून आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) हे राज्यातील सत्ताबदलाच्या लढाईसाठी मुंबईत ठाण मांडून आहेत. आधी लगीन राज्यातील सत्ताबदलाचे; मग दामाजी कारखान्याचे, असे काहीसे गणित आवताडे यांचे दिसून येत आहे. पण, सत्ता बदलामुळे येणाऱ्या मंत्रीमंडळात जिल्ह्यातून नव्या चेहऱ्याला की पुन्हा जुन्याला संधी मिळते, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. नव्या दमाचे आमदार आवताडेंना यात संधी मिळणार का? याची उत्सुकता मंगळवेढ्यात (Mangalveda) आहे. (Leaving the campaign of Damaji Sugar Factory, MLA Samadhan Avtade in Mumbai)

पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील सलग दोन पराभवानंतर पोटनिवडणूक जिंकायचीच, या तयारीने समाधान आवताडे यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली ताकद पाठीशी लावत निवडून आणले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे जनतेच्या विरोधी आहे. तुम्ही आवताडे यांना विजयी करा. मी राज्य सरकारचा कार्यक्रम करून दाखवतो, असा शब्द त्यांनी आवताडेंच्या पंढरपुरात झालेल्या सांगता सभेत दिला होता. पंढरपुरातील विजयामुळे समाधान आवताडेंचा चेहरा राज्यभर परिचित झाला.

Samadhan Autade
ठाकरेंनी दिलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत शिंदे म्हणाले, ‘मी त्याबाबत...’

देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील निवडणुकीत एक मतदारसंघाची जबाबदारी आवताडे यांच्यावर सोपवली होती. त्यामुळे ते फडणवीसांचे सोलापूर जिल्ह्यातील विश्‍वासू सहकारी अशी ओळख बनत आहे. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतही आवताडे यांची भूमिका महत्त्वाची होती. नव्या सरकरमध्ये मंत्रीपदासाठी जिल्ह्यातील अनेकांच्या नावाची चर्चा होत असली तरी त्यातील अनेक नावे ही जुनीच आहेत. पण, नव्यांना आमदार आवताडे यांनाही लॉटरी लागू शकते, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. शिवसेना बंडखोर आणि भाजप या दोघांच्या सरकारमध्ये अनेकांना संधी मिळू शकते. पंढरपूर परिसरात पक्षबांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने आवताडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमधून होत आहे.

Samadhan Autade
उद्धव ठाकरे आजही तुमचे नेते आहेत का..? एकनाथ शिंदेंनी दिले हे उत्तर...

सध्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ऐन रंगात आली आहे. पोटनिवडणुकीत मदत केलेल्या परिचारक गटाने कारखान्याच्या निवडणुकीत मात्र समविचारी गटासोबत जात आवताडे यांच्यासमोर आव्हान उभे केले. समविचारीच्या गटांत परिचारक समर्थकांना जवळपास दहा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप आमदार आवताडेंना आता भाजपच्याच परिचारक समर्थकाने समविचारीच्या रूपाने आव्हान दिले आहे. पण राज्यातील सत्ता बदलाच्या नाट्यामुळे समाधान आवताडे प्रचाराचे उद्‌घाटन करून मुंबईत ठाण मांडून आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आवताडे गटाची धुरा त्यांच्या समर्थकांमधून सांभाळली जात आहे, त्यामुळे आवताडेंसाठी एकीकडे राज्यातील सत्ता बदलाचे नाट्य आणि दुसरीकडे दामाजी कारखान्याचा प्रचार या दोन्ही गोष्टीला सामोरे जावे लागत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com