करुणा मुंडेंना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी लावला 30 लाखांना चुना : तीन जणांवर गुन्हा दाखल

करुणा मुंडे ( Karuna Munde ) यांना अल्पावधीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली.
Karuna Munde
Karuna MundeSarkarnama

Karuna Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे ( Karuna Munde ) यांना अल्पावधीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून, एका कंपनीत सुमारे 30 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र याबाबत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याबाबत संगमनेरातील तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारत संभाजी भोसले ( रा. डाबे वस्ती, कोंची, पो. निमगावजाळी, ता. संगमनेर ), विद्या संतोष अभंग व प्रथमेश संतोष अभंग ( दोघेही रा. घुलेवाडी, ता. संगमनेर ) अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे तीनही आरोपी करुणा मुंडेंनी काढलेल्या नव्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत.

या बाबत करुणा धनंजय मुंडे ( वय 42, रा. सांताक्रुझ, मुंबई ) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवार ( ता. 26 ) रोजी रात्री दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, संगमनेर मधील या तिघांनी धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या ओळखीतून, त्यांची पत्नी करुणा मुंडे यांचा विश्‍वास संपादन करीत, त्यांना लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीबाबत माहिती दिली. या कंपनीत 30 लाखांची आर्थिक गुंतवणूक केल्यास दरमहा 45 ते 70 हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले. तसेच यापेक्षा अधिक प्रमाणात नफा मिळाल्यास त्या प्रमाणात अधिक नफा देण्यात येणार असल्याचे सांगितले.

Karuna Munde
'कोल्हापूर उत्तर' : करुणा मुंडे यांना ६१ मत; निवडणूक रद्द करण्याची मागणी

या बोलण्याला भुलून करुणा यांनी 7 जानेवारी 2022 पासून दहा दिवसांत रोख व धनादेशाच्या स्वरुपात त्यांना 30 लाख रुपये दिले. गुंतवणूकीनंतर मात्र या तिघांनी कोणतीही अधिक माहिती व नफा न देता फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची खात्री पटावी यासाठी 45 हजार रुपये परतावा दिला. त्यानंतर मात्र फोन न घेणे किंवा विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे देणे असे प्रकार सुरु झाले. तसेच मुंडे यांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व समाजात बदनामी कऱण्याची धमकी दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच करुणा मुंडे यांनी थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठून योग्य त्या पुराव्यांसह फिर्याद दाखल केली. त्यानुसार तीघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत.

Karuna Munde
राज्यातील दोन मंत्री माझ्या पक्षात येणार - करुणा मुंडे;पाहा Video

काही महिन्यांपूर्वी आपल्या नवीन पक्ष स्थापनेच्या पार्श्वभुमीवर करुणा मुंडे यांनी संगमनेर येथे शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली होती. त्यात यातील आरोपींची ओळख नव्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून करुन दिली होती. त्यांच्याविरुध्दच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची वेळ मुंडे यांच्यावर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com