राष्ट्रपती राजवटीसाठी आता सदाभाऊंची संघटना मैदानात : केंद्राला पाठविणार ५ लाख पत्र!

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून विकास कामे ठप्प झालेली आहेत. जनतेचे अतोनात हाल होत आहेत.
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama

सोलापूर : अभिनेत्री केतकी चितळे हिचे समर्थन केल्याबद्दल माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) काही कार्यकर्ते धावून गेले, त्यावरून रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. याच मुद्यावरून ही संघटना आता केंद्र सरकारला ५ लाख पत्र पाठविणार असून त्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे राज्याचे प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी दिली. (Implement presidential rule in Maharashtra : 5 lakh letters to be sent to Rayat Kranti Sanghatana Kendra)

शिंदे म्हणाले की, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता पत्रकार, पोलिस यांच्यासमोर लोकप्रतिनिधींवर हल्ला करणे, हे लोकशाहीला घातक असून हिटलरशाहीचे प्रतीक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आत्तापर्यंत शेतकरी आंदोलन चिरडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे. विविध आंदोलनात आजपर्यंत ४० शेतकऱ्यांवर त्यांनी गोळ्या चालवल्या आहेत. आता तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून लोकप्रतिनिधींवर हल्ला करण्याचा सपाटाच चालू आहे. परंतु आमदार सदाभाऊ खोत व रयत क्रांती संघटना या भ्याड हल्ल्याला न घाबरता जनतेच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवत राहतील.

Sadabhau Khot
शेकापशी ३२ वर्षे एकनिष्ठ असणाऱ्या अख्ख्या गावाने केला शिवसेनेत प्रवेश

ते म्हणाले की, शेतकरी चळवळीच्या माध्यमातून गेली ४० वर्षापासून शेतकरी, शेतमजूर, तसेच सर्व घटकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचे काम आमदार सदाभाऊ खोत करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गृहखाते असते, तेव्हा तेव्हा अशा प्रकारच्या गुंडगिरीला चालना मिळते, हा इतिहास आहे. महाविकास आघाडी सरकार शेतकरी आत्महत्या, विद्यार्थी, कामगार, लघुउद्योजक अशा प्रत्येक घटकांच्या प्रश्नावर अपयशी ठरले आहे. केवळ सत्ता टिकवण्यासाठी व मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींवर दररोज हल्ले होत आहेत. म्हणून रयत क्रांती संघटनेतर्फे २५मेपासून ५ लाख पत्र केंद्र सरकारला पाठवण्याचे अभियान चालवणार आहे.

Sadabhau Khot
रोहितबाबा, ‘हे’ कुठल्या संस्कृतीत बसतं? : चंद्रकांत पाटलांचा पलटवार

केंद्राला लिहण्यात येणाऱ्या पत्रामध्ये राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून विकास कामे ठप्प झालेली आहेत. जनतेचे अतोनात हाल होत असून महाविकास आघाडी सरकार हे फक्त टीव्हीत व घरात बसून सरकार चालवत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या पक्षातील कार्यकर्ते लोकप्रतिनिधींवर दररोज हल्ला करत आहेत. म्हणून महाराष्ट्रातील सरकार त्वरित बरखास्त करा आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, अशा प्रकारचे ५ लाख पत्र रयत क्रांती संघटनेतर्फे महाराष्ट्रातून केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहेत, असे शिंदे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com