'सत्ता जाऊन जाणार कोठे, हे माहीत होते.... म्हणूनच मी ठाकरेंचा हात वर केला!'

मंत्रालयातील कामे मार्गी लावण्यासाठी कुठे जावे लागते, हे जनतेला समजले आहे
sharad pawar
sharad pawarSarkarnama

सोलापूर : राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये तीनही पक्षाचे मंत्री आहेत. हे मंत्री व्यवस्थित काम करतात. मंत्रालयातील कामे मार्गी लावण्यासाठी कुठे जावे लागते, हे महाराष्ट्रातील जनतेला समजले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीबद्दल (NCP) आता चिंता करण्याचे कारण नाही. मधल्या काळात आपल्याला जे सोडून गेले होते, त्यांना जनतेनेच सोडले होते. विधानसभेच्या निकालानंतर आम्ही थंड डोक्‍याने बसलो होतो. आम्हाला खात्री होती की सत्ता जाऊन जाऊन जाणार कोठे?, त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या. शिवसेनेच्या (Shiv Sena) जागा जास्त असल्याने आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद घ्या म्हणालो, उद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) माझ्या बाजूला होते. मुख्यमंत्रिपदासाठी मीच त्यांचा हात वर केल्याचीही आठवणही ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितली.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना ‘एफआरपी’पेक्षा जास्त रक्कम दिली आहे. ही रक्कम कारखान्याच्या नफ्यातील असल्याचे गृहित धरुन जादा दर देणाऱ्या कारखान्यांवर इन्कम टॅक्‍स लावला आहे. महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना बारा हजार कोटी रुपयांच्या दंड वसुलीच्या नोटीस आल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील खासगी कारखानदारांना मात्र केंद्रातील भाजप सरकारने नोटीस दिल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.

sharad pawar
शरद पवारांनी सोलापुरात मित्रालाच दिला जोरदार धक्का!

भाजप हर शेतकरी विरोधी पक्ष आहे. महागाईला निमंत्रण देणारी भाजपची नीती आहे. भाजपला खड्यासारखे बाजूला काढण्याची आवश्‍यकता आहे. शेतकऱ्यांची हत्या करणारे सरकार हे कधीच आपले असू शकत नाही. त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल, असे आवाहनही पक्षाध्यक्ष पवार यांनी केले.

एकरकमी एफआरपीसाठी काढावे लागेल कर्ज

काही संघटनांनी एकरकमी एफआरपी देण्याची मागणी केली आहे. पूर्वी आपल्याकडे व सध्या गुजरातमध्ये एफआरपीची रक्कम तीन टप्प्यांत दिली जात होती. ऊस गाळपानंतर साखर विक्री होण्यापूर्वीच एकरकमी एफआरपी देणे कठीण आहे. त्यातून साखरेला दर मिळणार नाही. कारखानदारांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे. एकरकमी एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना कर्ज काढावे लागेल. कर्जाच्या व्याजाचा बोजा हा पुन्हा शेतकऱ्यांवरच पडेल. एकरकमी एफआरपीमध्ये शेतकऱ्यांचे किती हित आहे, हे पहावे लागेल, असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले.

sharad pawar
सरकारी पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते; छापेमारीवर शरद पवारांचं वक्तव्य

पालकमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील नगर परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी नंबर वन झाली पाहिजे. जास्तीत जास्त नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती व व जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. इच्छुकांनी आत्तापासूनच घरोघरी संपर्क ठेवून तयारीला लागावे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान ज्या सभागृहातून शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा झाला, त्या मेळाव्यातून एल्गार झाला. त्याच ठिकाणी आज पुन्हा पवार यांच्या उपस्थितीत मेळावा व्हावा यासाठी आम्ही हे सभागृह घेतले. माझा नेता मोठा झाला, तरच मी मोठा होणार आहे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी ठेवावी. त्यामुळे मधल्या काळात काही जण पक्ष सोडून गेले होते. त्यातील काही जण पुन्हा पक्षात येऊन येण्यास इच्छुक आहेत. त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय झाल्यास त्यांच्यासोबत मिळून काम करण्याची तयारी ठेवावी, असे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले. या प्रसंगी आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माळशिरसचे नेते उत्तम जानकर, पंढरपूरचे नेते कल्याणराव काळे, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हा निरीक्षक सुरेश घुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com