नगरमधील शिवसैनिकांतील वाद कसा थांबणार...

साम्यवादी व समाजवादी विचारांचे गारूड असलेल्या या अहमदनगर ( Ahmednagar ) शहरात अनिल राठोडांनी ( Anil Rathod ) शिवसेना ( Shivsena ) वाढविली आणि भक्कम केली. मात्र त्यांच्या जाण्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचे बुरूंज ढासळू लागले आहेत.
Shivsena
ShivsenaSarkarnama

अहमदनगर : अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघ एककाळ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सलग 25 वर्षे अहमदनगर शहरातील सर्वसामान्य माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवलं. साम्यवादी व समाजवादी विचारांचे गारूड असलेल्या या अहमदनगर शहरात अनिल राठोडांनी शिवसेना वाढविली आणि भक्कम केली. मात्र त्यांच्या जाण्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचे बुरूंज ढासळू लागले आहेत. How to stop the dispute between Shiv Sainiks in Ahmednagar ...

1990च्या सुमारास देशात हिंदू जनजागृतीचे वारे वाहत होते. या हिंदुत्त्वाने भारावलेले अनेक तरूण निर्माण झाले. त्यातीलच एक खाद्यपदार्थ व्यावसायिक असलेले अनिल राठोड होते. त्यांचं समाजसंघटन उत्तम होते. त्यांच्या सानिध्यात येणारा कधी त्यांचाच होऊन जायचा हे त्यालाही कळतं नसायचं. समाजाशी एकरस झालेल्या माणसाला शिवसेनेने पक्षात घेतले. एवढेच नव्हेतर चक्क विधानसभेचे तिकीट दिले.

Shivsena
अनिल राठोड मंत्री होणार होते : गडाख

पहिल्याच विधानसभा निवडणुकीत दिग्गजांना पराभूत करत राठोड आमदार झाले. त्यांनी शहरातील पक्ष संघटन वेगात वाढवायला सुरवात केली. अहमदनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनविला आणि चितळे रस्त्यावर शिवसेनेचे शिवालय हे कार्यालय सुरू केले. या कार्यालयात कोणीही सामान्य माणूस सहज राठोडांना भेटू शकत होता. आपले दुःख मांडू शकत होता. राठोडही तात्काळ समस्या निवासण करायचे. प्रसंगी रस्तावर व प्रशासकीय कार्यालयांत जाऊन आंदोलने करायचे. त्यामुळे सामान्यांसाठी 24 तास उपलब्ध असलेला माणूस अशी त्यांची प्रतिमा होती.

त्यांच्या कारकिर्दीत अहमदनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने सत्ता मिळविली. शिवसेनेचे भगवान फुलसौंदर हे अहमदनगर महापालिकेचे पहिले महापौर झाले. अहमदनगर महापालिकेत शिवसेनेला चार वेळा महापौरपद मिळविता आले.

Shivsena
`चायना मेड, रस्त्यावर फोड !` ती माहिती मिळताच अनिल राठोड यांनी रस्त्यावर आपटले मोबाईल

शिवसेनेला राज ठाकरे यांनी शेवटचा जय महाराष्ट्र केला त्यावेळी काही शिवसेनेचे नगरसेवक व निष्ठावान कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेले. त्यातील काही कार्यकर्ते पुन्हा शिवसेनेत आणण्यात अनिल राठोड यांना यश आले.

राजकीय समीकरणे जुळविताना काही जोडलेली मने तुटत गेली. काही नवे शिवसैनिक जोडल्या गेले. 25 वर्षांनी त्यांनी विधानसभेत पराभव पहावा लागला. पराभवाबरोबरच आपली माणसं दुरावलेलीही पहावी लागली. मात्र तरीही ते कधी कोसळले अथवा डगमगले नाहीत. शेवटपर्यंत सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते रस्त्यावर होते. कोरोना कालखंड असतानाही लाखोंचा समुदाय त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी रस्त्यावर होता.

Shivsena
आमदार रोहित पवारांनी एकाच बाणात केले अनेक पक्षी घायाळ...

राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेत धुसफुस सुरू झाली. राठोड असतानाच निर्माण झालेले शिवसेनेचे दोन गट राठोड गेल्यावर सोशल मीडियावरून भांडताना दिसले. एका गटाने राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर ज्येष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा टाकण्यात आला. आम्हा सर्व एक आहोत असे जाहीर सांगण्याची वेळ आली.

अहमदनगर महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले. या पदासाठी शिवसेनेकडे तीन उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडे प्रत्येकी एक तर भाजपकडे उमेदवारच नव्हता. शिवसेनेचाच महापौर करायचा यासाठी शिवसेनेचे दोन्ही एकत्र दिसले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली पण महापौर होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावी, असे एका गटाला वाटत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी शिवसेनेचे हाडवैर आहे. असे असतानाही एक गटाने शिवसेनेचे व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेत्यांच्या दबावाने नगर महापालिकेत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणली. यात शिवसेनेचे भाकरे कुटूंब नाराज झाले. महापौर निवडणुकीच्या पूर्वसंध्येला एका हॉटेलमध्ये शिवसैनिक आपसात भिडले. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनाच शिवीगाळ झाली. संपर्क प्रमुखांची जीभही प्रसारमाध्यमांवर घसरली. या प्रकरणाने शिवसेनेचे दोन गट प्रकर्षाने दिसून आले.

Shivsena
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

महापौर पद मिळाल्यावर एकत्रित जल्लोष करताना दिसणारे दोन्ही गट पुन्हा महापालिकेत एकत्र दिसणे कमी झाले. शहरातील रस्त्याच्या प्रश्नावर शिवसेनेचे महापौर असताना त्यांना दूर ठेवत एका गटाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना मुंबईत निवेदन देऊन आले. या घटनेच्या तीन-चार दिवसा नंतरच शिवसेनेच्या त्याच गटाने महापालिकेत रस्त्यांच्या प्रश्नावर आंदोलन केले.

महापालिकेची निवडणूक अजून दोन वर्षांनी आहे. तोपर्यंत शिवसेना एकसंघ ठेवण्याचे आव्हान अहमदनगर जिल्हा दक्षिण प्रमुख प्रा. शशिकांत गाडे व संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यावर आहे. शिवसेनेतील एक गट सध्या शहरातील काँग्रेस व भाजप नेत्यांना जवळचा आहे. शिवसेनेचा दुसरा गट आमदार संग्राम जगताप यांच्या बरोबर दिसत असला तरी तो केवळ फायद्या पुर्ताच अशी स्थिती आहे.

आतापर्यंतच्या महापालिका निवडणुका शिवसेनेने जगताप कुटूंब दहशत करत असल्याचा मुद्दा पुढे करत भयमुक्त नगरचा नारा देत लढविल्या. मात्र आगामी निवडणुकीत ही स्थिती राहिलेली नाही. अनिल राठोड यांच्या सारखे मोठा नेत्यांची कमतरता निवडणुकीत जाणवण्याची शक्यता आहे. यातच अनिल राठोड यांच्या मोठ्या नेत्याच्या कार्यकाळात त्यांचा उत्तराधिकारी तयार झाला नाही. काही जण तर राठोडांनीच उत्तराधिकारी तयार होऊ दिला नाही, असे दबक्या आवाजात सांगतात. काहीही असो शिवसेनेत सध्या अनिल राठोडांची कमतरता भरून काढेल असा मोठा नेता शहरात नाही. याचा फायदा सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत आहे.

Shivsena
शिवसेना आमदाराने कामाचे श्रेय दिले नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणविसांना ;पाहा व्हिडीओ

संग्राम जगताप यांची खेळी

महापालिकेत शिवसेने बरोबर जाताना आमदार संग्राम जगताप यांनी एक महत्त्वाची खेळी खेळली आहे. महापालिकेत शिवसेनेशी जुळवून घेताना अडीच ते तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या व पुर्वाश्रमी शिवसेनेत असलेल्या नगरसेवकांना आमदार जगताप यांनी मोठी पदे दिली. शिवसेना - मनसे - राष्ट्रवादी असा प्रवास करणाऱ्या गणेश भोसले यांना उपमहापौर पद दिले तर शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या संजय चोपडा यांच्या पत्नीला महिला व बालकल्याण समितीचे उपसभापती केले.

शिवसेनाही खेळवतीय

वरकर्णी शिवसेनेत दिसत असलेले दोन गट फायद्यासाठी एकत्र आणि संग्राम जगताप यांच्याशी जुळवून घेताना विभक्त दिसत आहे. शिवसेनेचा राठोड गट हा अजूनही जगतापांशी हाडवैर ठेऊन आहे. शिवसेनेचा दुसरा गट राजकीय फायदा व वरिष्ठांचा आदेश पाळत राष्ट्रवादी बरोबर दिसत आहे. त्यामुळे सत्तेसाठी शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आली असली तरी मनाने एकत्र आलेली नाहीत.

नवीन मुद्दा शोधावा लागणार

सत्तेत असल्यामुळे शिवसेनेला रस्ते, पाणी, भयमुक्त नगर या प्रश्नावर आगामी महापालिका निवडणूक लढविणे कठीण जाणार आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्ता आहे. फेज 2 पाणी योजनेचे काम फसल्याची चर्चा आहे. संग्राम जगताप यांच्या बरोबर सत्ता उपभोगल्याने शिवसेनेला आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा भयमुक्त नगरचा नारा देता येणार नाही. हा नारा केव्हाच काँग्रेसच्या किरण काळे यांनी पळविला आहे. त्यामुळे शिवसेनेला नवीन मुद्द्याची गरज भासणार आहे. तत्पुर्वी शहरात भरीव काम करावे लागणार आहे. पण या कामाचे श्रेय आमदार संग्राम जगताप यांना मिळण्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपल्याच चक्रविव्हात अडकत चालल्याची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. हा चक्रविव्ह भेदणारा सध्यातरी शिवसेनेत नाही. सध्या आहेत त्यातीलच एखाद्याला हे काम करावे लागणार आहे. मात्र हा नक्की कोण असेल हेच अजून ठरायचयं. असे असले तरी आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वात मोठे आव्हान असेल ते शिवसेनेचेच.

Shivsena
विधान परिषदेसाठी बिगूल : मतदारयादीचे निकष जाहीर; मुदत संपलेले नगरसेवक हळहळले

पत्रकार काय म्हणतात...

शिवसेनेच्या दोन गटांबाबत पत्रकारांची मते भिन्न असली तरी अहमदनगर शहरात शिवसेनाच राष्ट्रवादीचा प्रमुख विरोधक राहील यावर पत्रकारांचे एकमत आहे. पत्रकार मयूर मेहता या विषयावर सांगतात की, महापालिकेत शिवसेनेचे दोन गट वरकर्णी आहेत. महापालिकेतील निर्णय आमदार संग्राम जगताप ठरवतात. शिवसेनेतील राठोड गटाचा जगतापांना तीव्र विरोध आहे. त्यामूळे सत्तेत असुनही हा गट महापालिकेपासून दूर राहतो. शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने वरिष्ठांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या नावाखाली जगतापांशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे हे वरकर्णी दोन गट दिसत आहेत. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीत हे दोन्ही गट एकत्रपणे राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात दिसतील, असे मत मयूर मेहता यांनी मांडले आहे.

ज्येष्ठ पत्रकार निशांत दातीर सांगतात की, 25 वर्षे ज्या अहमदनगर शहर मतदार संघानी शिवसेनेला भरभरून मताधिक्य दिले, ज्या शिवसैनिकांच्या संघटनेच्या जोरावर शहरात पक्ष मजबूत राहिला त्या शिवसैनिकांची वैचारिक मतभेद होऊ लागले आहेत. शिवसेनेचे दोन गट तयार झाले आहे. हे गट एकत्र येण्यासाठी ज्येष्ठ नेते आंबादास पंधाडे यांनी सर्वात पहिल्यांदा पुढाकार घेतला. त्या नंतर संपर्क मंत्री दादा भुसे व शंकरराव गडाख यांनी अथक परिश्रम घेतले मात्र अद्याप पर्यंत या प्रतिसादाला साद मिळताना दिसू येत नाही. समेट घडला तरच शिवसेनेला पूर्वी सारखे दिवस येतील, असे मत ज्येष्ठ पत्रकार निशांत दातीर यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com