
Kolhapur Political News : गोकुळ दूध संघाचे चाचणी लेखापरीक्षणाविरोधात दाखल केलेली संचालक मंडळाची याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. त्यामुळे माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाला धक्का बसला आहे. यानंतर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक आक्रमक झाल्या असून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची त्यांनी तयारी केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे पितळ सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांसमोर उघडे पाडणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. यामुळे गोकुळची सभा अनेक मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता असून याकडे लक्ष लागले आहे. (Latest Political News)
लेखापरीक्षणाविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळताच (Shaumika Mahadik) शौमिका महाडिकांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावरच आसूड ओढला आहे. अधिकाऱ्यांना सात तासात ७८ कॉल केल्यानंतरही जाग येत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान सत्याधाऱ्यांचा गलथान कारभार आणि सत्य दूध उत्पादकांसमोर आणण्यासाठी जिल्ह्यात सभा घेणार असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच १५ सप्टेंबरला गोकुळची सर्वसाधारण सभा होणार आहे. ही सभा लेखापरिक्षणाच्या मुद्द्यावरून गाजण्याची शक्यता आहे. घटलेले दूध संकलन व कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण हे मुद्देही सभेत गाजण्याची शक्यता आहे. या सर्व मुद्द्यावरून विरोधी महाडिक गट सत्ताधाऱ्यांना घेरणार आहे.
गोकुळ दूध संघातील सण २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षण करावे, अशी मागणी संचालिका शौमिका महाडिक यांनी राज्य सरकारच्या कृषी पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाच्या लेखापरीक्षण मंडळाकडे केली होती. मात्र अशा पद्धतीने चाचणी लेखापरीक्षण करणार येणार नाही, असे गोकुळच्या संचालक मंडळाचे म्हणणे होते. या मागणीविरोधात संचालक मंडळ उच्च न्यायालयात गेले होते. मात्र सातत्याने संचालक मंडळाने महाडिक यांच्या प्रश्नाला उत्तर न दिल्याने न्यायालयाने याचिका फेटाळली. त्यावर गोकुळचे संचालिका शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी संचालक मंडळावर आरोप केले आहेत.
काय म्हणाल्या शौमिका महाडिक ?
गोकुळने माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून माझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. न्यायालयाने गोकुळची याचिका फेटाळली आहे. सर्वांच्या भूमिकेला न्याय मिळाला. काही लोक पुढे आले नाहीत, पण मला सपोर्ट केला. १५ सप्टेंबरला गोकुळची सर्वसाधारण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सभा घेऊन गोकुळमधील सत्ताधाऱ्यांचा गैरकारभार लोकांच्यासमोर मांडणार असल्याचे, संचालिका महाडिक यांनी सांगितले.
अधिकाऱ्यावर दबाब ?
जिल्ह्यात जनावरांच्यात लम्पी संसर्ग बळावत असताना गोकुळ दूध संघाने आपले हात झटकले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाडिक यांनी जिल्ह्यात दौरा सुरू केला होता. त्याची माहिती गोकुळ दूध संघाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र दौऱ्यावर असताना संबंधित अधिकाऱ्यांचा फोन सात तास बंद होता. या सात तासांच्या कालावधीत ७८ वेळा त्यांना कॉल केला होता. त्याचा स्क्रीनशॉट माझ्याकडे आहे, असे म्हणत शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव होता? असा सवाल उपस्थित केला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.