Nagar District Bank News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची आज निवड झाली. रात्रीत घडलेल्या घडामोडीनंतर भाजपने (BJP) महाविकास आघाडीच्या हातातील जिल्हा बँक ताब्यात घेण्यात यश मिळवले.
बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) अर्ज दाखल केला होता. त्यांचा विजय निश्चित होणार असे मानले जात होते. मात्र, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी अर्ज दाखल केला. झालेल्या निवडणुकीत कर्डिले यांना 10 मते मिळाली, तर घुले यांना 9 मते मिळाली. एक मत बात झाले. त्यानुसार कर्डिले यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जिल्हा सहनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी गणेशपुरी यांनी जाहीर केले.
बँकेचे तत्कालीन अध्यक्ष उदय शेळके यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. अध्यक्ष पदासाठी कोणाला संधी मिळणार, याबाबत जिल्ह्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंगळवारी नगरमध्ये जिल्हा बँकेबाबत बैठक घेतली होती. त्या बैठकीत आवश्यक सूचना त्यांनी दिल्या होत्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अजित पवार हे बँकेच्या अध्यक्ष पदावर निर्णय घेतील, अशी शक्यता होती. मात्र, अचानक भाजपने मतदानाचा पवित्रा घेतल्याने मतदानाची प्रक्रिया पार पाडावी लागली.
महाविकास आघाडीचे 14 संचालक होते. तर भाजपचे चार आणि त्यांना माननारे दोन असे एकून सहा संचालक भाजपकडे होते. महाविकास आघाडीचे उमेदवार घुले यांना 9 मते पडली. त्यामुळे आघाडीची चार मते फुटली. या मतांमुळे कर्डिले यांचा विजय झाला. मंगळवारी अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या बैठकीला भाजपच्या संचालकांना बोलावले नव्हते. त्यावरुन खासदार सुजय विखे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. फडणवीस यांनी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली आणि निवडणूक लढवण्याच्या सूचना दिल्या.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज कर्डिले यांनी अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीला धक्का देत विजय खेचून आणला. सहकार्यामध्ये भाजपचे संचालक कुठेही मागे नाहीत, त्यांचा आदर सन्मान व्हायला हवा, अशी अपेक्षा यावेळी कर्डिले यांनी व्यक्त केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.