राज्यातील दुषित राजकीय वातावरणाला फेक न्यूज जबाबदार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) या फेक न्यूज विरोधात आंदोलन करणार आहेत.
राज्यातील दुषित राजकीय वातावरणाला फेक न्यूज जबाबदार
Supriya Sule Sarkarnama

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी संवाद कार्यक्रम आज अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये झाला. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी राज्यातील दुषित राजकीय वातावरणाला फेक न्यूज जबाबदार ठरवत फेक न्यूज विरोधात आंदोलन उभे करणार असल्याचे सांगितले. ( Fake news is responsible for the polluted political environment in the state )

केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी भरतीतील खासदार कोटा बंद करण्यात आल्या बाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा अयोग्य निर्णय आहे. कारण केंद्रीय विद्यालयेही शासकीय नोकरदारांच्या बदल्या व दुर्बल घटकातील मुलांसाठी होत्या. या विद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी आमच्याकडे मोठी मागणी होती. आम्ही केंद्र सरकारकडे आमचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली होती. लोकसंख्या वाढत आहे. गरिबाच्या मुलांना वाटते की आमचे भवितव्य या शाळांतून घडू शकते. माझी केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे की, विरोधी पक्ष हा सक्षम असलाच पाहिजे. सक्षम विरोधी पक्ष असणे हे कोणत्याही देशाच्या हिताचेच आहे.

Supriya Sule
सुप्रिया सुळे यांनी यासाठी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट..

राज ठाकरें बाबत बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही सत्तेत असोत अथवा नसोत मला महाराष्ट्रातील पोलिस यंत्रणेवर सार्थ अभिमान आहे. राज्यातील कष्टकरी असलेल्या पोलिसांबद्दल बोलणे दुर्दैवी आहे. धार्मिक विद्वेशाचे वातावरण कोणत्याही राज्य व देशासाठी हितकारक नसते. कोरोनाच्या संकटातून आता आपण कुठे बाहेर पडत आहोत. आर्थिक स्थिती थोडी सावरू लागली आहे. लोकांच्या हाताला काम मिळू लागले आहे. शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत. अशा स्थितीत वातावरण दुषित होणे यातून फक्त देशाचे नुकसान होईल. सामान्य माणसाचे नुकसान होईल. अशी वातावरण निर्मिती म्हणजे विरोधकांची निवडणुकीची तयारी हे नाकारता येणार नाही.

राष्ट्रवादीकडे एक नेता नाही. राष्ट्रवादी टॅलेंट फुल आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे अनेक वेळा अयोद्धेला जाऊन आलेले आहेत. संजय राऊतही अनेक वेळा अयोद्धेला जाऊन आले आहेत. मी तारखा काढून सांगू शकते. उद्धव ठाकरे यांचे कुटुंब अनेक वेळा अयोद्धेला गेले आहे. फेक न्यूजमुळे राज्यातील वातावरण गढूळ होत आहे. या फेक न्यूज विरोधात एक आंदोलन उभे करायला हवे. फेक न्यूजमुळे जे समज गैरसमज होतात त्याच्या विरोधात मी आंदोलन उभे करणार आहे.

Supriya Sule
Video: केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवर सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक

मी हनुमान चालिसा व भोंग्यात अडकलेली नाही. महागाईचा मुद्दा घेऊन मी जनसामान्यांत जात आहे. लोकसभेतही मी हा मुद्दा वेळोवेळी मांडला आहे. महागाईवर उपमुख्यमंत्री अजित पवारही बोलले आहेत. ते बोलले म्हणजे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस बोलल्या सारखी आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक होऊ पर्यंत केंद्र सरकारने दरवाढ केली नाही. त्यानंतर दरवाढ करण्यात आली. महागाईतून केंद्र सरकारने मार्ग काढावा. लोकांनी घरात चर्चा करावी की, आपण महागाईला महत्त्व द्यावे की भोंग्याला. घरातील महिला निश्चितच महागाई कमी करण्याला महत्त्व देतील. सर्वसामान्यांबाबत असंवेदनशील वागणे चुकीचे आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. कोरोनातून आता आपण कुठे बाहेर पडत आहोत.

राज ठाकरे यांना केंद्र सरकारने संरक्षण दिल्या बाबत त्यांनी सांगितले की, दिल्लीत जे दंगे झाले त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. कारण दिल्ली पोलिस हे राज्य सरकारच्या नसून केंद्राच्या अखत्यारीत आहे. मला महाराष्ट्रातील पोलिसांवर प्रचंड आदर व प्रेम आहे. देशातील सर्वाच चांगली पोलिस यंत्रणा महाराष्ट्रातील आहे. जे केंद्र सरकारची सुरक्षा घेतात त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. ज्या मातीत आपला जन्म झाला. त्या मातीच्या यंत्रणेवर आपला विश्वास नसेल तर ते किती दुर्दैव आहे, असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब वर्पे, आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते.

Supriya Sule
सुप्रिया सुळे म्हणतात, दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे महागाईही वाढणार नाही

मला त्यांना भेटायचय

सिल्व्हर ओकवर हल्ला करण्यासाठी आलेल्या महिलांचे काय म्हणणे आहे, त्यांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी मला त्यांना भेटायचे आहे. या महिला पोलिस कोठडीत आहेत. त्यांची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी त्यांना भेटून चर्चा करेल, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

महिला प्रदेशाध्यक्षाची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त असल्याबाबत विचारले असता खासदार सुळे म्हणाल्या की, हा निर्णय राज्यातील ज्येष्ठ नेते घेतील. सध्या आंदोलने व दौरे सुरू आहेत. तीन-चार दिवसांनी यावर पक्षातील नेते बसून निर्णय घेतील, असे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.