नगरमधील आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना तातडीची पाच लाखांची मदत जाहीर

या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Rajesh Tope
Rajesh TopeSarkarnama

मुंबई : नगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना तातडीची प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. (An emergency relief of Rs 5 lakh has been announced for families of the victims of the fire in nagar)

नगर जिल्हा रुग्णालयात कोविडच्या अतिदक्षता विभागात 17 कोविड रुग्ण उपचार घेत होते. त्यातील दहा जणांचा आज सकाळी अकराच्या सुमारास लागलेल्या आगीत मृत्यू झाला. ही आग शॉकसर्केटमुळे लागली होती, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये सहा पुरूष व चार महिलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण ज्येष्ठ नागरिक होते.

आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, नगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली आहे. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.

Rajesh Tope
नगरमधील दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे निर्देश

आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत आहे. या दुर्घटनेची चौकशी नगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी दिली.

दरम्यान, या आगीत रामकिसन विठ्ठल हरपुडे (वय 70, माका, ता. नेवासे), सीताराम दगडू जाधव (वय 83, बख्तरपूर, ता. शेवगाव), सत्यभामा शिवाजी घोडचौरे (वय 65, तेलकुडगाव, ता. नेवासे), कडूबाळ गंगाधर खाटिक (वय 65, पाथरवाला, ता. नेवासे), भिवाजी सदाशिव पवार (वय 80, किन्ही, ता. पारनेर), दीपक विश्वनाथ जेडगुले (वय 37, अश्वी, ता. संगमनेर), कोंडाबाई मधुकर कदम (वय 70, केडगाव, ता. नगर), आसराबाई गोविंद नांगरे (वय 58, शेवगाव, ता. शेवगाव), छबाबी अहमद सय्यद (वय 65, शेंडी, ता. नगर) आणि एक अनोळखी व्यक्ती अशा दहा जणांचा यात मृत्यू झाला आहे.

Rajesh Tope
अहमदनगरमधील दुर्घटने प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशीची मागणी

दुर्घटना स्थळाला नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व आमदार संग्राम जगताप यांनी भेट दिली त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, या अतिदक्षता विभागाचे फायर ऑडिट झालेले होते. नातेवाईकांच्या तक्रारी नुसार चौकशी होईल. रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य ती मदत दिली जाईल. या संदर्भात माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झालेले आहे. या घटनेमुळे अतिदक्षता विभागातील 1 रुग्ण खासगी रुग्णालयात तर इतर रुग्ण जिल्हा रुग्णालयातीलच इतर विभागांत हलविण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com