एकनाथ शिंदेंनी पहाटे दोनपर्यंत समजूत काढली अन्‌ राजेश क्षीरसागरांनी माघार घेतली!

Kolhapur | North assembly Election | : मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याने राजेश क्षीरसागर कमालीचे नाराज होते.
एकनाथ शिंदेंनी पहाटे दोनपर्यंत समजूत काढली अन्‌ राजेश क्षीरसागरांनी माघार घेतली!
Eknath Shinde | Rajesh Kshirsagar Sarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshree Chandrakant Jadhav) यांनी बाजी मारली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी काँग्रेस नेते आणि कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वात एकत्रित येत ही निवडणूक लढली होती. त्यामुळे भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यात यश आल्याची भावना तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. मात्र एका बाजूला शिवसेना (Shivsena) जरी या निवडणुकीच्या प्रचारात दिसत होती तरीही दुसऱ्या बाजूला अंतर्गत राजकारणामुळे निकाल लागेपर्यंत कोल्हापुरमधील शिवसैनिकांची नेमकी काय भूमिका असणार, याबाबत प्रश्नचिन्ह होते.

कारण कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडल्याने येथील माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) आणि शिवसैनिक कमालीचे नाराज झाले होते. त्या नाराजीतून क्षीरसागर दोन दिवस नॉट रिचेबल होते. याच नाराजी नाट्यातून ते बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याच्या देखील चर्चा कोल्हापुरमध्ये रंगल्या होत्या. पण मी शिवसेनेशी प्रमाणिक असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आदेश शिरोधार्ह मानून आम्ही काम करत असतो. त्यामुळे महाविकास आघाडी होताना जो निर्णय झाला आहे आणि पक्षप्रमुखांचा जो आदेश असेल, त्यांच्या मनात जे असेल त्याप्रमाणे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काम करण्यात येईल, असे सांगत त्यांनी आपल्या संभाव्य बंडखोरीतून माघार घेतली होती.

Eknath Shinde | Rajesh Kshirsagar
पोटनिवडणुकीचा निकाल लागताच सतेज पाटील 'ड्रीम प्रोजेक्ट'साठी धावले!

पण सर्व घटनाक्रमामधील पडद्यामागे कशापद्धतीने सूत्र हालवण्यात आली, याबाबतची माहिती आता समोर आली आहे. आज एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना स्वतः सतेज पाटील यांनी याबाबतचा उलगडा केला. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूर उत्तरमधील भूमिकेविषयी सतेज पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले, शिवसेनेतकडून कोल्हापुरमध्ये प्रचाराला कोण येणार याबाबत स्पष्टता होती. तर संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी उदय सामंत यांची होती. इथले काही उमेदवार बंडखोरी करणार होते. पण एकनाथ शिंदे यांनी पहाटे दोनपर्यंत त्या उमेदवारांना समजावलं आणि माघार घ्यायला लावली. मतांचे विभाजन रोखण्यासाठी त्यांनी स्वतः लक्ष घातले.

Eknath Shinde | Rajesh Kshirsagar
कोल्हापूर उत्तर : भाजपला या तीन वक्तव्यांमुळे गुलाल उधळता आला नाही...

याशिवाय राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून शिवसेनेला गती देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा राबविली. ते माझ्या देखील सातत्याने संपर्कात होते. दर दोन दिवसांनी फोन करुन काही कमी पडतयं का विचारायचे. त्यामुळे या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत तिन्ही पक्षातील नेते एकसंधपणे आमच्यासोबत होते, ही गोष्ट मी छातीठोकपणे सांगतो, असेही सतेज पाटील म्हणाले. दरम्यान निकालातून देखील ही गोष्ट दिसून आली. मतमोजणीत क्षीरसागर यांचे वर्चस्व असलेला भाग आणि खुद्द क्षीरसागर यांचा प्रभाग यामधून जयश्री जाधव यांना तब्बल ६५९० मताधिक्य मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.