
सातारा : कास पठारावर विविध रंगाची फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे येथे प्रदूषण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. ते टाळण्यासाठी यावर्षीच्या हंगामापासून पर्यटन राज्यमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून पठारावर लवकरच इलेक्ट्रीक बस मोफत सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली.
पर्यटन मंत्रालयाच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी रूचेश सुर्यवंशी यांनी वनविभाग, पर्यटन विभाग, पीएमपीएल पुणेचे सर्व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांसमवेत कास परिसराची मंगळवारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण टाळण्याकरिता फुलांचा हंगाम पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना ई-बस सफारी कशी घडवता येईल, याकरिता नियोजन सुरू झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी म्हणाले, ही प्राथमिक चाचणी पहिल्या टप्प्यातील असून येथे किती बस धावणार याबाबतचे पुढील विकासाचे नियोजन काय आहे, याचे स्पष्ट निर्देश पर्यटन मंत्रालयाकडून येतील.
मात्र, ई-बस सुरू झाली तर त्यासाठी पायाभूत सुविधा कशा निर्माण करता येतील याकरिता हा पाहणी दौरा आहे. पुढील आठवड्यामध्ये कास पठार समितीचे सदस्य पर्यावरण तज्ञ तसेच येथील स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करूनच सर्वसमावेशक आराखड्याचा अहवाल पर्यटन मंत्रालयाला पाठवला जाणार आहे.
पर्यटन राज्यमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून कास परिसर प्रदुषणमुक्त करण्यासाठी इलेक्ट्रीक बससारखा उपक्रम राबवण्यात येत आहे. या पठारावर जेवढे पर्यटक येणार आहेत. त्यांनी आपली वाहने खालीच पार्किंग करावीत. त्यानंतर त्यांना पीएमपीएल यांच्या मार्फत इलेक्ट्रीक बसने पठारावर आणले जाणार आहे.
येथील स्थानिकांना गाईड म्हणून ठेवण्यात येईल. एमटीडीसीमार्फत शौचालय उपलब्ध केली जातील. यावर्षी प्रथमच हा प्रकल्प राबवत येणार आहे. याला प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढीलवर्षी आणखी जोमाने हा उपक्रम पुढे नेणार आहोत, असे रूचेश जयवंशी यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.