विरोधकांनी माघार घेतली; पण भावानेच ठोकला शड्डू!

सिद्धेश्वर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादींना भावानेच आव्हान दिले
Dharmaraj Kadadi
Dharmaraj KadadiSarkarnama

सोलापूर : विरोधकांनी निवडणुकीतून माघार घेतली; पण भावानेच शड्डू ठोकल्यामुळे धर्मराज काडादी (Dharmaraj Kadadi) अध्यक्ष असलेल्या कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar factory) निवडणूक होणार असल्याचे आज (ता. १० डिसेंबर) स्पष्ट झाले. जिल्ह्यातील नेतेमंडळींसह धर्मराज काडादी यांच्या बिनविरोधच्या प्रयत्नाला खुद्द काडादींच्या भावानेच खो घातला आहे. विरोधक सिद्रामप्पा अब्दुलपूरकर यांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी आपला अर्ज मागे घेतला. पण, काडादींचे भाऊ संगमेश काडादी यांनी स्वत:चे पॅनेल उभारून त्यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. (Dharmaraj Kadadi the president of Siddheshwar factory was challenged by his brother)

सिद्धेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी अध्यक्ष काडादी हे दुपारपर्यंत वेगवान हालचाली करत होते. अर्ज माघारीचा आज (ता. १० डिसेंबर) शेवटचा दिवस होता. काडादींनी केलेले आवाहन आणि मागील पाच निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन विरोधी गटाचे सिद्रामप्पा अब्दुलपूरकर यांनी शेवटच्या क्षणी आपला अर्ज माघारी घेतला. अब्दुलपूरकरांनी अर्ज माघार घेतल्याची वार्ता धर्मराज यांचे निवासस्थान असलेल्या ‘गंगा निवासवर धडकली. पण तो आनंद तत्काळ ठरला. कारण, कारखान्याची निवडणूक आता बिनविरोध होणार, असे वाटत असतानाच काडादी यांचे भाऊ संगमेश काडादी यांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला होता. नेतेमंडळींसह अध्यक्ष काडादी यांनी प्रयत्न करूनही शेवटी सिद्धेश्वर कारखान्याची निवडणूक लागलीच.

Dharmaraj Kadadi
माजी राज्यमंत्र्यांसह पाच आजी-माजी आमदारांनी प्रयत्न करूनही ‘सिद्धेश्वर’ची निवडणूक लागलीच!

संगमेश काडादी हे तिसऱ्यांदा कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उरतले आहेत. त्यांनी मागील दोन निवडणुका अब्दुलपूरकर यांच्या पॅनेलमधून लढवल्या होत्या. संचालक मंडळाच्या वीस जागांसाठी ही निवडणूक लागली असली तरी विरोधक संगमेश काडादी हे किती जागा लढविणार? त्यांच्या पॅनेलमधील उमेदवार व त्यांची नावे याबाबत त्यांनी मौन बाळगले आहे. धर्मराज काडादी यांच्या पाठिशी राहून जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, काडादींना घरातूनच धोबीपछाड मिळाली आहे.

Dharmaraj Kadadi
राष्ट्रवादीतील कलहामुळे एक सदस्य असलेल्या काँग्रेसला मिळाली सत्तेची खुर्ची!

आप्पासाहेब काडादींनी संधी दिली मात्र, आपटे-अब्दुलपूकर सत्ताधारी झाले

सिद्रामप्पा अब्दुलपूरकर आणि वसंत आपटे यांना (कै.) अप्पासाहेब काडादी यांनी 1978 ते 1996 या कार्यकाळात कारखान्यावर संचालक म्हणून घेतले होते. त्या सत्तेचा फायदा घेत आपटे आणि अब्दुलपूरकर यांनी 1996 च्या निवडणुकीत काडादी व चाकोते यांचा पराभव करत सिद्धेश्वरची सत्ता मिळवली होती. त्यानंतरच्या म्हणजेच 2001 पासून आजपर्यंतच्या प्रत्येकी निवडणुकीत काडादी यांनी आपली सत्ता कायम राखली. अब्दुलपूरकर यांनी काडादी यांच्या विरोधात आतापर्यंत पाच निवडणुका लढवल्या. पण त्यांंना पराभवच स्वीकारावा लागला आहे.

अर्ज मागे घेण्याचे माझे ठरले होते : अब्दुलपूरकर

सिद्धेश्वर साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. पुन्हा निवडणुकीचा खर्च कारखान्यावर पडू नये, यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, असे मला वाटले. त्यासाठी काडादींचे मित्र मला भेटायला आले होते. पण, मी कॉम्प्रमाईजसाठीच अर्ज भरला होता. अर्ज मागे घेण्याचे माझे ठरले होते, त्यानुसार मी आज (शुक्रवारी) अर्ज माघार घेतला, असे माजी संचालक सिद्रामप्पा अब्दुलपूरकर यांनी सांगितले.

नातेसंबंधांपेक्षा शेतकरीहित माझ्यासाठी महत्वाचे : संगमेश काडादी

शेतकऱ्यांच्या हितासाठी मी निवडणूक लढवित आहे. धर्मराज काडादी हे माझे मोठे बंधू आहेत. नातेसंबंधापेक्षा मला शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे वाटते. शेतकरी माझ्यासाठी देव आहेत. त्यांच्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांचे भाऊ संगमेश काडादी यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com