
Beed : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभेनंतर बीडमध्ये रविवारी (ता. २७) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची सभा होत आहे. अजितदादांची सभा ही शरद पवारांच्या सभेपेक्षा मोठी व्हावी, यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीने सभेसाठी शहरात उभारलेल्या स्वागत कमानी आणि बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असल्याची टीका नागरिकांनी केली आहे.
सजावटीच्या अतिरेकामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. सामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारणारे पालिका आणि बांधकाम प्रशासन संबधितांवर कारवाई करणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहेत. शेकडो बॅनरची उभारणी, परिसराचे विद्रुपीकरण आणि चक्क रस्ते खोदून कमानी उभारुन शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि वाहतूकीस अडथळा येत असल्याने नेटकरी संतप्त झाले आहेत.
या सभेला जिल्ह्याच्या विकासाचे आणि अस्मिततेचे नाव दिले असले तरी यातून सत्तेत सहभागी राष्ट्रवादीला ताकद दाखवून द्यायची आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी ताकद लावली आहे. सभेपूर्वी शहरात चार दिवसांपासून बार्शी नाका ते जालना रोड, शिवाजी महाराजांचा पुतळा ते नगर रोडवर ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर आणि कटआऊट्स तसेच कमानी लावल्या आहेत.
अनाधिकृत बॅनर, सिमेंट रस्ते खोदून कमानींची उभारणी यावर पालिका आणि बांधकाम प्रशासन कुठलीही कारवाई करत नसल्याने प्रशासनावर बुजगावणे असल्याचा आरोप करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली बुजगावणे तयार करुन जिल्हाधिकरी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
एकीकडे विनापरवाना बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात असताना नगर पालिकेसह बांधकाम विभागाने चुप्पी साधली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून होणाऱ्या वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. सिमेंटच्या रस्त्याला होल पाडल्याने या मुख्य महामार्गाला तडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नागरिकांमधून संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.