काँग्रेसचा मोठा निर्णय : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर करणार पक्षप्रवेश
दिल्ली - मागील सात ते आठ वर्षांपासून भाजप अधिकाधिक सशक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाची ही स्थिती पाहता ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) यांनी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. भाजपच्या अश्वमेधाचा रथ रोखण्यासाठी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश घटविण्याचे आता निश्चित झाले आहे. आगामी दोन दिवसांत हा पक्ष प्रवेश होईल. ( Congress's big move against BJP: Political strategist Prashant Kishor will join the party )
मागील सहा महिन्यांपासून प्रशांत किशोर व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरू होत्या. त्यानुसार निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे. त्यांच्यावर निवडणूक रणनीती आणि समविचारी पक्षांसोबत आघाडीची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला काँग्रेसने तोड शोधून काढल्याची चर्चा आहे. (Prashant Kishor Latest News)
दिल्लीत सोनिया गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षाच्या कमकुवत सांगितल्या. या कमकुवत बाजू सुधारण्यासाठी कोणत्या बाबींची आवश्यकता आहे याची माहितीही त्यांनी दिली होती. त्यानुसार पक्ष संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आगामी काळात मोठे फेरबदल पहायला मिळण्याची शक्यता आहे.
प्रशांत किशोर यांच्या संदर्भात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोनिया गांधींशी चर्चा केली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही प्रशांत किशोर यांचा अनुभव व रणनीतीकार असण्याचा फायदा काँग्रेसला मिळू शकेल असे सांगितले आहे. काँग्रेसचे पुनरुज्जीकन करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी कृती आराखडा तयार केला आहे. यासंदर्भात नुकतेच 52 स्लाइड्सचे प्रेझेंटेशन त्यांनी कॉँग्रेस नेत्यांच्या बैठकीत दिले.
प्रशांत किशोर यांनी बुधवारी (20 एप्रिल) राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली. मागील पाच दिवसांत प्रशांत किशोर हे चौथ्यांदा सोनिया गांधींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. काँग्रेस नेतृत्व मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, किशोर यांनी दिलेल्या सूचनांनुसार, पुढील एक-दोन दिवसांत चर्चेची फेरी संपेल. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत किशोर यांनी गेहलोत आणि बघेल यांच्यासमोर आपली रणनीती मांडली. त्यांनी काही अतिरिक्त सूचनाही केल्या आहेत. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते अंबिका सोनी आणि सुरजेवाला उपस्थित होते.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्या सूचनांवर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. आगामी निवडणुकीत काँग्रेस संघटना अधिक प्रभावी करणे, संघटनात्मक बदल करणे, लोकांच्या अपेक्षेनुसार संघटना करणे आदी गोष्टींचा या सूचनांमध्ये समावेश आहे. मागील तीन दिवसांपासून या सूचनांवर सखोल चर्चा सुरु आहे. किशोर यांनी सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते.
प्रशांत किशोर यांनी त्यांच्या सादरीकरणात असेही म्हटले आहे की, काँग्रेसने लोकसभेच्या सुमारे 370 जागांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. काँग्रेसने महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये युती करुन निवडणूक लढवावी अशी सुचनाही प्रशांत किशोर यांनी केली आहे.
दोन दशकांहून अधिक काळ अहमद पटेल आणि मोतीलाल व्होरा हे ज्येष्ठ नेते कॉँग्रेसमधील राजकीय व आर्थिक संकटावर तोडगा काढण्याची जबाबदारी पार पाडत होते. या दोघांच्या मृत्यूनंतर काँग्रेसमध्ये त्यांची भूमिका कोणीही घेऊ शकलेला नाही, त्यामुळे अनेक राज्यांमध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत लढा सुरूच आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पटेल, व्होरा यांची उणीव भरून काढण्याचा प्रयत्नात काँग्रेस नेतृत्व आहे.
काँग्रेसचे पराभवावर चिंतन
पाच राज्यांतील दारुण पराभवानंतर काँग्रेसने राजस्थानच्या उदयपूरमध्ये 14 ते 16 मे दरम्यान चिंतन शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात पाच राज्यांतील पराभवाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच गुजरातसह चार राज्यांतील आगामी निवडणुकीची रणनीती, काँग्रेसमधील संघटनात्मक आणि धोरणात्मक बदल यावर चर्चा केली जाणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह इतर दिग्गज नेते शिबिराला उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी 2013 मध्ये राजस्थानच्या जयपूरमध्ये शिबिर झाले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.