काँग्रेसचा स्वबळाचा नारा म्हणजे बडा घर पोकळ वासा!

काँग्रेसच्या नगरसेवकांमधील अनेक जण भालके यांना मानणारे होते.
Congress
Congresssarkarnama

मंगळवेढा : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काँग्रेस (Congress) नेत्यांनी सोलापुरात (Solapur) स्वबळावर लढण्याचा इशारा दिला. मात्र, तीन महिन्यावर येवून ठेपलेल्या निवडणूकीबाबतच्या तयारीचे काय? असा प्रश्न या निमित्ताने समोर येऊ लागला. (Congress will contest Mangalwedha municipal elections on its own)

मागील नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचे तत्कालीन आमदार स्व. भारत भालके व राष्ट्रवादीचे नेते राहुल शहा यांच्या पुढाकारातून नगरपालिकेवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्या युतीमध्ये जवळपास 12 जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून जिंकल्या होत्या. त्यामध्ये सात जागा या काँग्रेसच्या आहेत. नगराध्यक्षपद थेट जनतेतून असल्यामुळे राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष हजार एक मतांच्या फरकाने विजयी झाला. काँग्रेसच्या नगरसेवकांमधील अनेक जण भालके यांना मानणारे होते. परंतु जागावाटपाच्या तडजोडीत ते काँग्रेसच्या गोटात गेले. साडेचार वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले.

Congress
महेश कोठेंचा राष्ट्रवादीवर भरोसा नाय का?

2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्व. भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या ताब्यात असली तरी राजकीय सत्तेच्या चाव्या भालके यांच्या हातात राहिल्या. मात्र, भालके यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा राखता आली नसली तरी नगराध्यक्ष अरुण माळी यांचे काम समाधान कारक ठरले. पक्ष नेते अजित जगताप यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्यात यशस्वी ठरल्याने शहरात आजमितीला राष्ट्रवादीचा गट प्रबळ असला तरी स्व. भालकेच्या पश्चात पहिल्या नगरपालिका निवडणुकीत सामोरे जाणे हे देखील त्यांना आव्हान आहे.

Congress
रजनी पाटील यांचा अर्ज भरताना रंगली एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीची चर्चा

दरम्यान, गत आठवड्यात सोलापूर येथे झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात मंगळवेढ्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा दावा केला. पण शहरात काँग्रेसचा गट मजबूत होण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणेचा अभाव आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून काँग्रेस सत्तेत आहे. आजतागायत काँग्रेसच्या वरिष्ठ मंत्र्यांनी देखील तालुक्यातील प्रमुख प्रश्नांमध्ये लक्ष घातलेले दिसत नाही. विशेषता 2014 मध्ये प्रशासकीय मान्यता दिलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी आता देखील राष्ट्रवादीच्या बरोबरीने काँग्रेसच्या नेत्यांनी लक्ष देणे आवश्यक होते.

तालुक्याचे आणि शहरातील प्रश्‍न वेगळे असल्यामुळे शहरातील प्रश्नासाठी देखील काँग्रेसच्या नेत्यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. मात्र, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सलग दोन पराभवानंतर देखील त्यांनी मंगळवेढ्याकडे म्हणावे तितके लक्ष दिले नाही. जिल्ह्यातील नेतृत्व बदलानंतर मोहिते पाटील घराण्याकडे केल्यामुळे त्यांच्याकडून देखील शहरासाठी मजबूत पक्ष बांधणीची अपेक्षा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे. खासदारकी बरोबर आमदारकीची जागा पटकावण्यात यशस्वी ठरलेल्या भाजप नेत्यांच्या समोर टिकाव धरण्यासाठी काँग्रेसचे दिलेली घोषणा मंगळवेढा शहरासाठी मात्र 'बडा घर पोकळ वासा' ठरू नये, अशी अपेक्षा निष्ठावंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून बोलली जात आहे. त्यामुळे घोषणे बरोबर तीन महिन्यातील तयारीदेखील निर्णायक ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in