उदयसिंहांची मनधरणी अपयशी; सहकारमंत्र्यांना निवडणूक लढावी लागणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंटी पाटील यांना फोन करून उदयसिंहांशी बोलण्यास सांगितले. बंटी पाटील यांचा शेवटचा फोन उंडाळकरांना आला. मात्र, उदयसिंह आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
Balasaheb Patil, Udaysinh patil
Balasaheb Patil, Udaysinh patilsarkarnama

सातारा : जिल्हा बॅंक निवडणुकीत सुरवातीपासून चर्चेत असलेल्या कराड सोसायटी मतदारसंघातील तिढा सोडविण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नांना यश न आल्याने या मतदारसंघात आता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि उदयसिंह पाटील उंडाळकर समोरासमोर ठाकले गेले आहेत. दोन्ही नेत्यांनी आज कृषी उत्पादन व प्रक्रिया मतदारसंघातून अर्ज भरावेत. चर्चेची दारे खुली ठेवावीत, असे प्रयत्न दोन्ही बाजूंकडील पदाधिकारी, कार्यकर्ते शेवटपर्यंत करत होते. मात्र, अखेरच्या क्षणी तसे घडले नाही. दोघांनीही केवळ सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केल्याने हा तिढा कायम राहिला.

कराड सोसायटी मतदारसंघ हा (कै) विलासराव पाटील उंडाळकर यांचा पारंपरिक मतदारसंघ. कित्येक वर्षे या मतदारसंघातून उंडाळकर यांनी बॅंकेत प्रतिनिधित्व केले. त्यांच्या काळात जिल्हा बॅंक नावारूपासही आली. आता त्यांच्या पश्‍चात त्यांचे पुत्र उदयसिंह यांनी या मतदारसंघावर आपला हक्क सांगत सर्वांच्या आधी अर्जही दाखल केला होता. खरेतर उदयसिंह यांच्या संचालक पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कोणत्याही नेत्याचा विरोध नव्हता. मात्र, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि उदयसिंह यांच्यातील लढत टळावी, असेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत होते.

Balasaheb Patil, Udaysinh patil
उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला;पाहा व्हिडिओ

एकडे उदयसिंहांचीही वेगळी भूमिका नव्हती. त्यासाठीच आज जिल्हा बॅंकेत रामराजे नाईक निंबाळकर, शिंवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील आदी राष्ट्रवादीचे नेते खलबते करत होते. तर तिकडे उंडाळकरांच्या घरी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते ठाण मांडून होते. राष्ट्रवादीकडून रामराजे, शिवेंद्रसिंहराजे, शशिकांत शिंदे सातत्याने फोनवरून उंडाळकरांच्या संपर्कात होते. शेवटी दोन्ही बाजूंकडून ठरले असे, की आज सहकारमंत्री पाटील यांनी कऱहाड सोसायटी आणि कृषी उत्पादन व प्रक्रिया या दोन्ही मतदारसंघातून अर्ज दाखल करावा. उदयसिंह यांनी आधीच सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.

Balasaheb Patil, Udaysinh patil
सहकारमंत्र्यांची जिल्हा बॅंकेतील 'एन्‍ट्री' ॲड. उदयसिंह पाटील रोखणार...

त्यांनी आज कृषी प्रक्रियेतूनही दुसरा अर्ज दाखल करावा. अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत आपल्याला वेळ मिळेल. आपण चर्चेतून मार्ग काढू, असा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी घेतला. हा निर्णय उंडाळकरांना पोहचविण्यात आला. यावर उंडाळकरांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ''बाळासाहेबांनी कृषी प्रक्रियेतून अर्ज दाखल करू देत. माझा अर्ज गेटवर तयार आहे. मीही भरतो.''

Balasaheb Patil, Udaysinh patil
ॲड. उदयसिंह उंडाळकरांची मुंबईत खलबते; कृष्णासह जिल्हा बॅंकेसाठी घेतली शरद पवारांची भेट

असे समजते, की बाळासाहेब पाटील यांनीही कृषी प्रक्रियेतून आपला अर्ज तयार ठेवला होता. अखेर अर्ज माघारीची मुदत संपण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली, तसतसे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे उंडाळकर यांना फोन वाढू लागले. आगामी विधानसभा, बाजार समितीचे दाखले राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना दिले. त्यावर बाळासाहेबांनी अर्ज दाखल केला की मी ही करतो. शेवटी माझा हा पारंपरिक मतदारसंघ आहे. काही झाले तरी मी आता माझ्या कार्यकर्त्यांना उघडे पाडू शकत नाही, असे उंडाळकरांनी ठामपणे सांगितले.

Balasaheb Patil, Udaysinh patil
उदयसिंह पाटलांचा उमेदवारी अर्ज; अन्‌.. सहकारमंत्र्यांच्या उंडाळेत गाठीभेटी!

अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंटी पाटील यांना फोन करून उदयसिंहांशी बोलण्यास सांगितले. बंटी पाटील यांचा शेवटचा फोन उंडाळकरांना आला. मात्र, उदयसिंह आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर मुदत संपेपर्यंत बाळासाहेबांनी कृषी प्रक्रियेतून अर्ज दाखल केला नाही आणि उदयसिंहांनीही नाही. आणि आता हे दोन्ही नेते समोरासमोर राहिल्याने पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com