
पुरंदर : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे फक्त भारतच नाही तर जगभरातील तब्बल ३३ देश हादरले. ३३ देशांनी या बंडांची नोंद घेतली, असे खळबळजनक दावे करत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांनी माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांचा पुरंदरमधील शेतकळी मेळावा खळखळून हसवला. या मेळाव्याला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह, माजी मंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार तानाजी सावंत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते.
शहाजीबापू पाटील म्हणाले, मागच्या दोन महिन्यांपासून कोण आम्हाला बंडखोर म्हणतं आहे, कोणी उठाव केला म्हणतं आहे. कोण गद्दार, कोण खुद्दार म्हणतं आहे. त्यांना जे काही म्हणायचं आहे ते म्हणून दे. पण महाराष्ट्राच्या राजकारणाला जगाच्या पाठीवर दैदिप्यमान दिपवून टाकणारी ही क्रांती आहे हे लक्षात ठेवा. अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार चालले. पण आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायचे नव्हते. आम्ही गल्लोगल्ली, गावोगावी फिरुन शिवसेना-भाजपच्या नावाने मत मागितली होती. पण आमचा गुलाल उतरायच्या आधीच आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला नेवून बांधलं. (Shivsena MLA Shahaji Patil Latest News)
त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही आनंदाने स्वीकारलं. पण अडीच वर्षात काय झालं आमचं? सगळी माध्यम, सगळे लोक म्हणतात एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेवून गेले. एकनाथ शिंदेंनी बंड केले. पण तुम्हा सगळ्यांच्या पाया पडून सांगतो, आम्ही ४० जण एकनाथ शिंदेंना घेवून गेलो, एकनाथ शिंदेंनी आम्हाला नाही नेले. तरीसुद्धा मी साडेतीन तास आधी सुरतमध्ये पोहचलो होतो. त्यानंतर एकनाथ शिंदे आले, असे काही खुलासे देखील आमदार पाटील यांनी केले.
अडीच वर्षांच्या काळात एक नगरविकास विभाग सोडला तर आम्हाला दुसरीकडे कुठे निधी मिळत नव्हता. मी आजवर कोणाची चमचेगिरी केली नाही. पण एक निक्षून सांगतो की यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटलांनंतर कोणाचं नेतृत्व पटलं असेल तर ते एकनाथ शिंदे यांचे आहे. अत्यंत बारकाईने अभ्यास करुन मी वक्तव्य केले. लहानपणापासून या माणसानं अपार कष्ट केले. आनंद दिघे भेटल्यानंतर माणसाची दिशा बदलली आणि आज मुख्यमंत्रीपदापर्यंत येवून थांबलेले आहे.
शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले, यापुढे घराघरात शिंदे साहेबांचा विचार पोहचला पाहिजे. त्यासाठी गावागावात सभा लावा, मी येण्यासाठी तयार आहे. आपण मावळ्याप्रमाणे हे काम करायला पाहिजे. मी शिंदे यांचाच सैनिक आहे. कोणी जरी आडवं आलं तरी आता थांबतं नसतो. रणगाडा आडवा लागला तरी उडी मारुन जाणार. आयुष्यात शिंदे यांचीच आठवण शेवटची असेल. त्यांच्याच आठवणीने माझा प्राण जाईल. कारण ही क्रांती सोपी नव्हती. संपूर्ण जगं थांबले होते. इंग्लंड हादरले, अमेरिका हादरली, जगातील ३३ देश हादरले. त्याचवेळी राज्यात मात्र उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील एकालाही कळले नाही हे कसे झाले, असे चिमटे देखील पाटील यांनी काढले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.