Solapur Politics : सोलापूरचे राजकारण बदलवणार ‘सिद्धेश्वर’ची चिमणी!

सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि काही विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची ताकद निर्णायक आहे. त्यामुळे चिमणीविरोधात भूमिका घेण्यास कोणताही राजकीय पक्ष आज पुढे येताना दिसत नाही.
Siddheshwar Sugar factory-Dharmraj Kadadi
Siddheshwar Sugar factory-Dharmraj KadadiSarkarnama

सोलापूर : सोलापूरच्या (Solapur) राजकारणात अवघड काय आहे, या प्रश्नाचे उत्तर जर कोणी शोधत असेल तर त्यांना या जिल्ह्यातील मराठा, लिंगायत आणि धनगर समाजाची व्होट बॅंक विचारातच घ्यावी लागते. जिल्ह्यातील हे तीनही प्रमुख समाज आपल्यासोबत ठेवण्यासाठी कधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नामांतर तर कधी मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या पूजेपासून रोखण्याचा प्रयत्न झाला. लिंगायत समाजाची अस्मिता म्हणून ओळख असलेल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar factory) चिमणीही तशीच व्होट बॅंकेत अडकली आहे. कागदोपत्री पाडायला सहज अन् सोपी वाटणारी चिमणी भल्याभल्यांना घाम फोडून गेली आहे. (Chimney of Siddheshwar Sugar factory will affect the politics of Solapur)

सद्यस्थितीला चिमणी जरी कारखान्याची दिसत असली तरीही भविष्यात हा जिल्हा कोणाचा? आणि या जिल्ह्याचा नेता कोण? हे ठरविण्याची ताकद या चिमणीत दडली आहे. सोलापुरातील होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी सध्या चांगलीच तापली आहे. ही तापलेली चिमणी पडणार की चटक देणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Siddheshwar Sugar factory-Dharmraj Kadadi
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर हे तर मंगळसूत्र चोरून आमदार झालेत : राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांचा गंभीर आरोप

केंद्रातील मनमोहनसिंग सरकार असो की राज्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असो किंवा शिवसेनेसोबत कॉंग्रेस व राष्ट्रवादीने केलेले महाविकास आघाडीचे सरकार असो. चिमणी का टिकली? हा प्रश्न जसा सुटत नाही, तसाच प्रश्न केंद्रात मोदी सरकार असो की राज्यात फडणवीस किंवा आताचे शिंदे-फडणवीस सरकार असो. कोणत्याही सरकारने चिमणीला थेटपणे का हात घातला नाही? हा प्रश्न भाबड्या सोलापूरकर जनतेला पडलेला आहे. जसा प्रश्न केंद्रातील व राज्यातील सत्ताधाऱ्यांचा आहे, तसाच प्रश्‍न जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनाचाही आहे. चिमणीसाठी कोणाचा दबाव होता का? हे देखील समजण्यास मार्ग नाही.

Siddheshwar Sugar factory-Dharmraj Kadadi
Adv. Gunaratn Sadavarte : ॲड. सदावर्तेंनी स्थापन केलेला एसटी कष्टकरी जनसंघ फुटीच्या मार्गावर

प्रत्येक सत्ताधारी कारखान्याच्या चिमणीभोवती फक्त घिरट्याच घालत आहे. चिमणी जरी सिद्धेश्वर साखर कारखान्याची असली तरीही या चिमणीवरच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे व या लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व अवलंबून आहे. भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे वय पाहता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसकडून नवखे उमेदवार मैदानात येण्याची शक्‍यता आहे. त्या निवडणुकीत कारखान्याची चिमणी महत्त्वाची भूमिका निभावू शकते. भाजप आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी यांच्या मतदार संघात देखील चिमणीचा इफेक्‍ट निर्णायक ठरणार आहे.

Siddheshwar Sugar factory-Dharmraj Kadadi
Baramati : इंडियन एअर फोर्सच्या ‘चेतक’चे बारामतीत अचानक लॅंडिंग!

काँग्रेस विचारांच्या काडादींचे सर्वपक्षीय संबंध

धर्मराज काडादी कोणत्याही पक्षाचे नाहीत, तरीही ते सर्वच सत्ताधाऱ्यांना हवे आहेत. २०१४ व २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने गेलेल्या लिंगायत व्होट बॅंकेला विस्कळित करण्याची ताकद तापलेल्या चिमणीत आहे. अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्‍यात चिमणी बचावासाठी सुरु झालेला लढा त्याचेच द्योतक मानले जात आहे. १९९५ ते १९९८ च्या दरम्यान कॉंग्रेसच्या तिकिटावर सोलापूर लोकसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्या धर्मराज काडादी यांनी नंतरच्या काळात सर्वपक्षीयांना आपल्यासोबत ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडूनही धर्मराज काडादी यांना निवडणूक लढविण्याची ऑफर देण्यात आली हेाती. त्यांनी त्यावेळी निर्णय घेतला नाही. आगामी काळात काडादी चिमणी बचावासाठी थेट काही राजकीय भूमिका घेतात का? हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

काडादी सिद्धेश्वर देवस्थानवरही का बोलत नाहीत?

काडादी म्हणजे सब चलता है... हा मेसेज सोलापुरात रुजला आहे. चिमणी, गंगा निवासाचे बांधकाम, सिद्धेश्वर देवस्थानमधील सुशोभीकरण अशी अनेक उदाहरणे देऊन सोलापूरच्या विकासाला काडादी यांच्यामुळे खीळ बसल्याचा आरोप केला जात आहे. आरोपात तथ्य असेल किंवा नसेलही परंतु शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर देवस्थान सुधारले, अक्कलकोट सुधारत आहे. पंढरपूरसाठी काशीविश्वनाथच्या धर्तीवर कॉरिडॉर आणला. तुळजापूर-अक्कलकोटवरून पंढरपूरला जाणारा भाविक सिध्देश्‍वरांच्या दर्शनाला सोलापुरात का थांबत नाही? सिद्धेश्वर देवस्थानच्या विकासासंदर्भात कोणतेच सरकार का ठोस पावले उचलत नाही? देवस्थानच्या विषयावरही काडादी का थेटपणे बोलत नाहीत. याचाही विचार करण्याची आवश्‍यकता आहे.

चिमणीसाठी अक्कलकोट-बार्शीमार्गे मुंबईतून सूत्रे हलली

तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या काळात सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी सर्व यंत्रणा चिमणीजवळ पोचली होती. त्यावेळी चिमणी वाचविण्यासाठी सिद्धेश्वर कारखान्यावरून अक्कलकोट-बार्शीमार्गे मुंबईतून हाललेली सूत्रे महत्त्वाची ठरली. तेव्हा वाचलेली चिमणी पाडण्यासाठी आणि होटगी रोड विमानतळावरून विमान उडविण्यासाठी कागदं रंगविण्याच्या पलिकडे फारसे काही ठोस प्रयत्न झाल्याचे दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com