सुटीच्या दिवशी पारनेर बंदची हाक : राष्ट्रवादीने साधला शिवसेनेवर निशाना

पारनेर नगरपंचायतने विशेष सभा घेत नीलेश लंके प्रतिष्ठानला हॉस्पिटलसाठी जागा देण्याचा घाट घातला.
Parner
ParnerSarkarnama

पारनेर ( जि. अहमदनगर ) - पारनेर नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पारनेर नगरपंचायतने विशेष सभा घेत नीलेश लंके प्रतिष्ठानला हॉस्पिटलसाठी जागा देण्याचा घाट घातला. या विरोधात शिवसेनेचे काही नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या या वादात आज पारनेर बंदही ठेवण्यात आले. शिवसेनेच्या या आक्रमक आंदोलनाला राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढत उत्तर दिले आहे. Parner News Update

डॉ. बाळासाहेब कावरे यांनी म्हंटले आहे की, शनिवारी बहुतेक व्यापारी सुटी घेतात. सुटीच्या दिवशी गाव बंदची हाक देऊन विरोधकांनी काय साधले असा सवाल कावरे यांनी केला आहे. शासनाची जागा धर्मदाय संस्थेस सामाजिक कामासाठी कराराने दिली जाते. त्यावर मालकी हक्क कोणाचाही नसतो. तो शासनाचाच असतो. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल करून गलिच्छ राजकारण करण्यात येत आहे. पारनेर शहराचा नागरिक म्हणून माझी शहरवासीयांना विनंती आहे की विकृत मनोवृत्तीच्या इतिहास तपासावा व त्यांच्या विचारांना भिक घालू नये असे आवाहन डॉ. कावरे यांनी केले आहे.

Parner
नीलेश लंके प्रतिष्ठानला जमीन देण्याला शिवसेना नगरसेवकांचा विरोध : आज पारनेर बंद

त्यांनी पुढे म्हंटले आहे की, देवस्थानच्या जमिनीवर बंगले, हॉटेल बांधणारे, शासकीय जागेवर इमारत बांधून दुकाने सुरू करणारे, तहसील, बसस्थानक परिसरात टपऱ्या टाकणारे नीलेश लंके प्रतिष्ठानला अत्याधुनिक धर्मदाय रूग्णालय उभारणीसाठी देण्यात येणाऱ्या भूखंडासाठी विरोध करीत आहेत. या आंदोलनास राजकीय वास येत असून स्वतःला काही उभे करता आले नाही म्हणून इतरांच्या उपक्रमांना विरोध केला जातो आहे. गोरगरिबांना सर्व प्रकारचे मोफत उपचार मिळणार असतानाही केवळ राजकीय सूड भावनेतून हे सर्व सुरू आहे. अर्थात पारनेरकर हे सर्व जाणून आहेत. त्यांचा या रूग्णालयास पाठिंबा आहे. चार दोन विरोधकांनी कितीही कोल्हेकुई केली तरी हे रूग्णालय उभे राहणारच असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

भूखंडाला विरोध करणारी हीच टोळी माजी आमदारांचे घर अतिक्रमणात आहे असा गाजावाजा करीत होती. आता परत त्यांच्याच पायापुढे लोटांगण घेत आहे. हे खाटिकाने पशुहत्या करू नये असे प्रवचन देण्यासारखे झाल्याचे डॉ. कावरे यांनी म्हंटले आहे.

Parner
नीलेश लंके यांनी विरोधकांचे त्रिफळा उडविण्याचे रचले मनसुबे

पारनेर शहर बंदची हाक देणाऱ्या टोळीला गावाचे काहीच देणे-घेणे नाही. त्यांना फक्त चांगल्या कामात आडवे येऊन ब्लॅकमेल करणे एवढेच माहिती आहे. गट नंबर 96 मध्ये व्यापारी संकुल उभारा, घरकुल उभारा, कोर्ट इमारत बांधा हे आता सांगत आहेत. तेच पूर्वी गावाबाहेर न्यायालय न्यायचे का ? गावची बाजारपेठ बाहेर नेऊन गाव ओस पाडणार का यासाठी आंदोलन करीत होते याची आठवण करून देतानाच आता गावाबाहेर सगळे जावे म्हणून आंदोलन करीत आहे. यांच्या भूमिका प्रत्येक वेळी बदलतात. केवळ विरोध करायचा एवढाच उद्योग असल्याचे कावरे यांनी सांगितले.

गट नंबर 96 मधील जमीन शासनाची आहे. नगरपंचायतीचा व या जमीनीचा काडीमात्र संबंध नाही. नगरपंचायतीस केवळ ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे. असे असतानाही सर्व काही नगरपंचायतीच्याच हातात आहे असे भासवून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे. नगरपंचायतकडे रूग्णालयाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. तो नगरपंचातीने बहुमताने मंजूर केला. त्यात वावगे असे काय झाले ? प्रतिष्ठानला जमीन देऊ नये अशी मागणी करून विकृतीचे दर्शन घडविले जात आहे. त्या जमिनीवर सेवाभावी दवाखाना उभा राहणार आहे. तेथे बिलेच आकारण्यात येणार नाहीत. सर्दी, खोकल्यापासून कॅन्सर, बायपास, डायलिसिस पर्यंच्या सर्व आजारांवर मोफत उपचार होणार आहेत. पारनेर शहर, तालुका, जिल्हा अगदी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील रूग्णांवर तेथे मोफत उपचार होणार आहेत, त्याला तुमचा विरोध का असा सवाल डॉ. कावरे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in