जयंत पाटलांना होमपिचवरच मोठा धक्का

सांगली जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपचे राहुल महाडिक यांचा विजय
Rahul Mahadik
Rahul MahadikSarkarnama

इस्लामपूर (जि. सांगली) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant Patil) यांना त्यांच्या होम पीचवर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जबरदस्त झटका बसला आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी बँका-पतसंस्था गटातून विजय मिळविला आहे. राहुल महाडिक यांच्या रुपाने महाडिक कुटुंबातील पहिल्या सदस्याने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळामध्ये प्रवेश केला आहे. महाडिक यांचा हा विजय सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांना धक्का देणारा आहे. या विजयाने महाडिक गटाला एक प्रकारचे टॉनिक मिळाले आहे. इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात महाडिकांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. (BJP's Rahul Mahadik wins Sangli District Bank election)

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडीकडून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात पॅनेल तयार करण्यात आले होते. या निवडणुकीत वाळवा तालुक्यातून बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, ॲड. चिमण डांगे, वैभव शिंदे, राहुल महाडिक, सी. बी. पाटील, भानुदास मोटे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोसायटी गटात राष्ट्रवादीकडून एकतर्फी लढत होती. तर राहुल महाडिक यांनी बँका, पतसंस्था गटातून अर्ज दाखल केला होता. महाडिक समर्थकांनी अर्ज भरलेल्या दिवसापासूनच ‘महाडिक गट विषय कट’ अशी घोषणा देत राहुल महाडिक निश्चित विजयी होतील, असा दावा केला होता.

Rahul Mahadik
विश्वजित कदमांच्या मावसभावाचा पराभव घडवत जगतापांनी मुलाच्या पराभवाचा हिशेब चुकता केला

राहुल महाडिक यांनी बँका-पतसंस्था गटात जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील मतदारांच्या बरोबर वैयक्तीक पातळीवर संपर्क साधून प्रचाराचे रान उठवले होते. पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे बंधू राष्ट्रवादीचे किरण लाड यांना पराभूत करत महाडिक यांनी जयंत पाटील आणि आमदार अरुण लाड यांना धक्का दिला आहे.

Rahul Mahadik
आर.आर. पाटील गटाने पराभवाचा वचपा काढला; सांगली बॅंक निवडणुकीत तासगावमध्ये राष्ट्रवादी विजयी

वास्तविक बँका-पतसंस्था गटात राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस यांचे एकतर्फी वर्चस्व असूनही महाडिक यांनी आपल्या जिल्हाभर पसरलेले कार्यकर्ते व वैयक्तीक संपर्काच्या जोरावर ही निवडणूक जिंकली. या निवडणुकीमुळे वाळवा तालुक्यात महाडिक गटाला उभारी मिळाली आहे. राहुल यांच्या रुपाने जिल्हा बँकेत प्रथमच महाडिकांचा आवाज घुमणार आहे. राहुल महाडिक यांच्या विजयासाठी त्यांचे बंधू सम्राट महाडिक, इस्लामपूरचे माजी नगरसेवक कपील ओसवाल, नगरसेवक अमीत ओसवाल यांनी परिश्रम घेतले. जिल्हा बॅंकेतील विजयामुळे आगामी जिल्हा परिषद व इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत महाडिक गट राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवणार, हे मात्र निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com