फडणवीसांनी जबाबदारी सोपवली अन्‌ कल्याणशेट्टींनी यशस्वी करून दाखवली!

सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर जबाबदारी दिलेल्या मये मतदारसंघात भाजपचे प्रेमेंद्र शेट विजयी
BJP Celebration
BJP CelebrationSarkarnama

अक्कलकोट : गोवा विधानसभा निवडणुकीचे मुख्य प्रभारी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मये विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर सोपविली होती. आपल्या कल्पक नेतृत्वाची आणि व्यूहरचनेची चुणूक दाखवत प्रेमेंद्र शेट यांचा विजयरथ 3023 मताधिक्यांने किनारी पोचविण्यासाठी कल्याणशेट्टी यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या विजयामुळे पक्षाच्या दरबारात कल्याणशेट्टी यांचे राजकीय वजन वाढणार आहे. (BJP's Premendra Shet wins Maye constituency in Goa)

मये येथे यापूर्वी आमदार राहिलेले प्रवीण झांट्ये यांनी ऐन निवडणुकीत भाजपची साथ सोडली. पक्षाने प्रेमेंद्र शेट यांच्यावर विश्वास व्यक्त करीत त्यांना मये येथून उमेदवारी दिली. त्यांच्या विजयाची जबाबदारी प्रभारी फडणवीस यांनी आपले विश्वासू आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर सोपविली होती. त्यांच्या जोडीला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत या स्थानिक प्रभारी म्हणून काम पाहिले. आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर जबाबदारी सोपवल्यानंतर निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महिनाभर आधीपासून निवडणूक होईपर्यंत सात ते आठ वेळा गोव्याला गेले होते. गोव्यातील स्थानिकांना सोबत घेत कोणीही नाराज होणार नाही, याची काळजी घेऊन प्रचार यंत्रणा व्यवस्थित हाताळली.

BJP Celebration
हायकमांडने आदेश देताच सत्तास्थापनेचा दावा करू : फडणवीसांचे वक्तव्य!

मये मतदारसंघात प्रेमेंद्र शेट यांना 7636 तर, पराभूत प्रवीण झांट्ये यांना 3240, संतोष सावंत 4613, राजेश कलंगुटकर 2053, श्रीकृष्ण परब 3933 तर मिलिंद पिळगांवकर 2282 अशी मते पडली आहेत. कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट भाजपची 40 जणांची यंग ब्रिगेड घेऊन दिवस रात्र मेहनत घेतली. शेवटच्या तीन दिवसांत प्रत्येक मतदारांपर्यंत आपण पोचलो की नाही, याचा त्यांनी स्वतः आढावा घेतला. स्थानिक पदाधिकाऱ्यांना विभागून काम देऊन आपले काम फत्ते केले. सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतलेली मेहनत फळाला असून मये मतदारसंघातून शेट हे विजयी झाले आहेत.

BJP Celebration
प्रमोद सावंतांनी सांगितली भाजप सरकार स्थापनेची स्ट्रॅटेजी!

दरम्यान, भाजपच्या विजयानंतर अक्कलकोटमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. पक्षाचे झेंडे फडकवत जोरदार घोषणाबाजी करून एकमेकांना आणि नागरिकांना साखर भरवून तसेच गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. अक्कलकोट शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. या वेळी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, महेश हिंडोळे, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, यशवंत धोंगडे, दयानंद बिडवे,अंकुश चौगुले,ऋषी लोणारी, प्रवीण शहा,मिलन कल्याणशेट्टी,अतिष पवार,सिद्धाराम मठपती,शिवशंकर स्वामी,धनंजय गाढवे,संजय राठोड,राजकुमार बंदीछोडे,शिवशंकर स्वामी,रमेश कापसे,कांतू धनशेट्टी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

BJP Celebration
शिवसेनेने आता २ खासदार अन्‌ २० आमदार निवडून आणून दाखवावेत :भाजपचे खुले आव्हान

हे तर माझे कर्तव्यच : सचिन कल्याणशेट्टी

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेली विकासकामे तसेच मये येथील भाजचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचा आणि कष्टाचा हा विजय आहे. माझ्यावर सोपविलेली जबाबदारी ही माझे अक्कलकोटचे 40 तरुण कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जिद्दीने यशस्वी करून दाखवली आहे. पक्षनेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिक प्रयत्न करणे, हे माझे कर्तव्यच आहे. गोव्यातील मतदारांनी दिलेल्या कौलाचे आभार मानावे, तेवढे थोडेच आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com