महेश कोठेंना बालेकिल्ल्यातच अडकविण्याचा विजयकुमार देशमुखांचा मास्टर प्लॅन

विडी घरकुलमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जंगी मेळावा घेण्याचे नियोजन देशमुख यांनी आखले आहे.
महेश कोठेंना बालेकिल्ल्यातच अडकविण्याचा विजयकुमार देशमुखांचा मास्टर प्लॅन
Devendra Fadnavis-Vijaykumar Deshmukh-mahesh koteSarkarnama

सोलापूर : सोलापूर महापालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस अशीच होणार हे आता जवळपास निश्‍चित झाले आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरचा दौरा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्याचे नियोजन आता सुरु झाले आहे. माजी महापौर महेश कोठे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या विडी घरकुलमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जंगी मेळावा घेण्याचे नियोजन आमदार विजयकुमार देशमुख यांनी आखले आहे. (BJP will hold rally presence of Devendra Fadnavis at Mahesh Kote's Constituency)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ऑक्‍टोबर महिन्यामध्येच सोलापूर महापालिका निवडणुकीचा शुभारंभ करण्याच्या तयारीत भारतीय जनता पक्ष आहे. दरम्यान, 20 ऑक्‍टोबरच्या दरम्यान माजी मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापुरात येण्याची शक्‍यता आहे. विकास कामांचे उद्‌घाटन आणि मेळावा घेण्याचे नियोजन आखले जात आहे.

Devendra Fadnavis-Vijaykumar Deshmukh-mahesh kote
राणेंचा शिवसेनेला जोरदार धक्का : पंचायत समितीच्या सदस्यांचा भाजपत प्रवेश

माजी महापौर महेश कोठे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूर महापालिकेसाठी पहिल्यांदाच मोठी ताकद लावण्याची तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुकीतील जवळपास सर्वच सूत्रे ही माजी महापौर महेश कोठे यांच्या हातात जाणार, हे जवळपास आता निश्‍चित झाले आहे. दुसरीकडे महापालिकेत पुन्हा भारतीय जनता पक्षाचीच सत्ता आणण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य या दोन विधानसभा मतदार संघात विशेष लक्ष घालत मास्टर प्लॅन आखला आहे. माजी महापौर महेश कोठे यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या विडी घरकुल परिसरात अडकवून ठेवण्याचा डाव भाजपकडून टाकण्यात येत आहे. त्या दृष्टीने भाजपकडून डावपेच आखले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारा मेळावा आणि विकास कामांच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम घेतला जात आहे.

Devendra Fadnavis-Vijaykumar Deshmukh-mahesh kote
‘सरकारी पाहुणे’ शोध मोहिमेत व्यस्त अन्‌ अजितदादांच्या कारखान्याचा गाळप हंगाम दणक्यात सुरू

भाजपचे 2017 च्या निवडणुकीमध्ये 49 नगरसेवक विजयी झाले होते. त्यातील जवळपास 33 नगरसेवक हे आमदार विजयकुमार देशमुख गटाचे आहेत. त्यामध्ये आता उघडणपणे बहुजन समाज पक्षाच्या एका नगरसेवकाची भर पडली आहे. सोलापूर शहर उत्तरमधील सर्वच्या सर्व जागा एकहाती जिंकण्यासाठी आमदार देशमुख यांनी बूथ पातळीवरील यंत्रणा अधिक भक्कम केली आहे. शिवसेनेकडून 2017 मध्ये विजयी झालेले राजकुमार हंचाटे आणि अनुराधा काटकर हे सध्या देशमुख यांच्या गटात असल्याने भाजपची आणखी ताकद वाढली आहे.

Related Stories

No stories found.