‘राष्ट्रवादीच्या कामांचे श्रेय घेण्यासाठी आमदार आवताडेंनी अधिकाऱ्यांवर दबाव आणला’

भाजप आमदार समाधान आवताडे यांच्यावर राष्ट्रवादीच्या अजित जगताप यांचा आरोप
Samadhan Avtade
Samadhan AvtadeSarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा शहर विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) माध्यमातून महाविकास आघाडीने २० कोटींचा निधी दिला. मात्र, एक दमडीचा निधी न आणणाऱ्या भाजप आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी राष्ट्रवादीने केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणून विकासकामांचे उद्‌घाटन करण्याचा खटाटोप थांबवून विकास निधी आणावा. मग, विकास कामांचे खुशाल उद्‌घाटन करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप यांनी केले. (BJP MLA Samadhan Avtade accused by NCP's Ajit Jagtap)

जगताप म्हणाले की, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नगरोत्थान योजनेतून कल्याणप्रभू देवस्थानसमोर सभा मंडप बांधण्यासाठी २०१९-२० पासून प्रयत्नशील आहे. या कामासाठी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी १४ लाख रुपयांचा निधी दिला. त्या निधीतून नगरपालिकेने सभामंडपाचे बांधकाम केले. परंतु आमदार समाधान आवताडे यांनी यात कोणतेही योगदान अथवा या कामासाठी काहीही प्रयत्न न करता जाणूनबुजून केवळ फुकटचे श्रेय घेण्यासाठी प्रशासक व मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकून स्वतःच्या हस्ते उद॒घाटन करून आयत्या बिळावर नागोबा होण्याचा प्रयत्न केला आहे. हे लोकप्रतिनिधीला न शोभणारे आहे.

Samadhan Avtade
शिंदे, थोरातांच्या आशीर्वादामुळे सिद्धाराम म्हेत्रेंचे काँग्रेसमधील वजन वाढले

वास्तविक पाहता महाविकास आघाडी सरकारमुळे शहरासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यामुळे मागेल तेवढा निधी मिळत आहे. पालकमंत्री भरणे तसेच सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकास कामांचे उद्‌घाटन करण्याचे ठरलेले असताना केवळ निष्क्रियपणा झाकण्यासाठी फुकटच्या श्रेयासाठी लोकप्रतिनिधी स्वतःच्या हस्ते स्वतःची पाटी लावून उद्‌घाटन करीत आहेत, असा टोला जगताप यांनी आमदार आवताडे यांना लगावला.

Samadhan Avtade
पवारांच्या बालेकिल्ल्यातून राजू शेट्टींचा पुन्हा एल्गार...!

ज्या मंगळवेढ्याने विधानसभा निवडणुकीत मताधिक्य दिले, त्या शहरासाठी त्यांनी एक रुपयांचा आमदार निधी दिला नाही. शिवाय सरकारकडे निधी मागणीचे एकही पत्र दिलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायम नगरपालिकेला निधीबाबत सढळ हाताने मदत केली आहे. पालकमंत्री भरणे व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० कोटी निधीतून अनेक कामे मार्गी लागली, तर आणखी काही कामे प्रास्तावित आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना विकास कामे कोणामुळे झाली हे माहित आहे. आमदार आवताडे यांनी दुसऱ्यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या कामाचे उद्‌घाटन करण्यापेक्षा स्वतः पाठपुरावा करून विकास कामे मंजूर करावीत. त्यामुळे तालुक्याचा विकास होईल व त्यांनाही विकास कामांचे उद्‌घाटन करण्याची संधी मिळेल, असा टोलाही जगताप यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com