Ahmednagar News: 'ती' बैठक जिव्हारी लागली! अन् नगर जिल्हा बॅंकेत विखेंनी डाव टाकला; कर्डिलेंनी फिरवली टोपी

Shivaji Kardile : अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची निवड झाली.
Shivaji Kardile, Radhakrishna Vikhe Patil
Shivaji Kardile, Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

Ahmednagar District Bank News : अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांची निवड झाली. जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या बहुतेक निवडणुका बिनविरोध होण्याचा पायंडा आहे. मात्र, या वेळी मतदान घेण्याची वेळ आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), कॉंग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या संचालकांची मंगळवारी झालेली बैठक भाजपनेत्यांच्या जिव्हारी लागली. अध्यक्ष निवडीपासून भाजपला दूर ठेवल्याचा वचपा भाजप नेत्यांनी बॅंकेवर वर्चस्व मिळवूनच काढला.

दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बॅंक अर्थात जिल्हा बॅंक ही जिल्ह्याची कामधेनू. आशिया खंडातील सहकार क्षेत्रातील पहिली बॅंक म्हणून तिचा लोकिक आहे. बॅंकेची स्थापना १९५८ मध्ये झाली आहे. मोतीलाल फिरोदिया, के. बी. रोहमारे, मारुतराव घुले, भाऊसाहेब थोरात, विठ्ठलराव विखे पाटील यांनी बॅंकेच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. यशवंतराव गडाख, राधाकृष्ण विखे पाटील यांनी बॅंकेत आधुनिकीकरण आणण्याचा प्रयत्न केला. २००८ ते ९ या काळात कर्डिले यांना बॅंकेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली होती.

Shivaji Kardile, Radhakrishna Vikhe Patil
Nagar News : नगरमध्ये आघाडीला धक्का : एका रात्रीत खेळ पलटला; थोरात-पवारांची काल बैठक अन् आज चार मते फुटली

संचालक असतानाही कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बॅंकेत महत्त्वाचे निर्णय होऊ शकले. त्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना एकरी पाच हजारांहून २० हजारांपर्यंत कर्ज वाटप करण्याचा निर्णय, गायी घेण्यासाठी खेळते भांडवल हे उल्लेखनीय निर्णय होत. अध्यक्ष उदय शेळके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर गेल्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती. त्यानंतर राजकीय सुत्रे हालण्यास वेग आला. २० संचालकांतून ही निवड होणार होती.

महाविकास आघाडातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा, कॉंग्रेसचे चार व शिवसेनेचे एक, तसेच भाजपचे सहा संचालक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा अध्यक्ष होईल, हे निश्चित होते. अजित पवार व बाळासाहेब थोरात हे सांगतील, त्यांनाच संधी मिळणार होती. याबाबत मंगळवारी नगरमध्ये त्यांच्या उपस्थितीत संचालकांची बैठक झाली. या बैठकिला भाजपच्या संचालकांना बोलाविण्यात आले नव्हते. भाजपला दूर ठेवून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणे, हेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), खासदार डॉ. सुजय विखे पाटील, ज्येष्ठ संचालक कर्डिले यांना सलत होते.

Shivaji Kardile, Radhakrishna Vikhe Patil
Ahmednagar News : विखेंनी बॅंक ताब्यात घेतली; मतदान झाल्यावरच बिंग फुटले : थोरातांना धक्का देणारे चारजण कोण?

ही बाब त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कानावर घातली. देशात सहकाराच्या विकासासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह प्रयत्न करीत आहेत. असे असताना जिल्ह्यात भाजप संचालकांना दूर ठेवले, ही बाब नेत्यांना खटकली. फडणवीस यांनी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे भाजप नेत्यांशी संवाद साधला. अध्यक्षपदासाठी कर्डिले यांनी अर्ज भरण्याचे ठरले. केवळ सहा संचालक हाती असताना विजयश्री खेचण्यासाठी महाविकास आघाडीतील चार संचालकांना फोडण्यात विखे पितापुत्र व कर्डिले यशस्वी झाले. या अनपेक्षित घडामोडीमुळे सर्वजण अवाक झाले. हे फुटलेले चारजण कोण? याबाबत आता तर्कवितर्क होऊ लागले आहेत.

त्यांनी 'टोपी' फिरविली

माजी मंत्री शिवाजी कर्डिले मुरब्बी राजकारणी आहेत. जिल्हा बॅंकेत राजकारणात तज्ज्ञ संचालक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी 'टोपी' फिरविली, की काहीही घडू शकते, हे नगर जिल्ह्यातील राजकारणी गमतीने म्हणतात. त्याचेच प्रत्यंतर निवडणुकीत दिसून आला. कोणाच्या ध्यानी मनी नसताना तसेच संचालकांचे कमी बळ असतानाही विजयश्री खेचून आणली. महाविकास आघाडीला मोठा दणका दिला. या निवडीचा परिणाम आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या राजकारणावर होणार आहे. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीतील घडामोडीही या निवडणुकीवर बऱ्याचशा अवलंबून असतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in