राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांवर भाजप नेत्यांचा ‘वॉच’
NCP-BJPSarkarnama

राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांवर भाजप नेत्यांचा ‘वॉच’

भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी पुन्हा अंतर्गत कलहाने बेजार झाली आहे.

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पदाधिकारी निवडीवरून मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांच्या हालचालीवर काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे बारीक लक्ष आहे. (BJP, Congress leaders focus on disgruntled NCP office bearers)

मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. ‘ज्येष्ठ नेते शरद पवार बोले मंगळवेढा हाले’ अशी परिस्थिती होती. पण, 2009 ते 2019 या कालावधीत राष्ट्रवादीला उतरती कळा लागली होती. ती 2019 मध्ये आमदार भारत भालके यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भक्कम झाली. भालके यांच्या अकाली निधनामुळे पुन्हा राष्ट्रवादी अंतर्गत कलहाने बेजार झाली आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला ही जागा ताब्यात ठेवण्यात अपयश आहे. त्यातून सध्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चुळबूळ सुरू आहे.

NCP-BJP
दिलीप मोहितेंचा शिवसेनेला दुसरा दणका : राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सेनेचे बंडखोर बनले उपसभापती

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल केले. काहींना जिल्हा कार्यकारिणीत स्थान देण्यात आले, त्यावरून राष्ट्रवादीच्या एका गटाने आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा ठपका ठेवत थेट पक्षाध्यक्ष पवारांकडे तक्रार केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पवारांनी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना ‘विश्वासात घेऊन पदाधिकारी निवडी करा,’ अशा सूचना दिली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या एका गटाला जिल्हा अध्यक्ष साठे यांनी नवीन कार्यकारणी स्थगित करण्यात आल्याचे पत्र दिले, तर दुसऱ्या गटाला नवी व जुनी कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याचे पत्र दिले. नव्या कार्यकारिणीतील निवड जलसंपदा मंत्री, पालकमंत्री दोन्ही गटातील प्रमुख पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कार्यकारिणी अध्यक्ष यांच्या संयुक्त बैठकीद्वारे निवडण्याचे ठरले. त्यामुळे या वादावर तूर्त पडदा पडला असला तरी अंतर्गत धुसफूस सुरू आहे.

NCP-BJP
‘मला मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते...’ फडणवीसांच्या या विधानावर पंकजा म्हणाल्या...

...तर पोटनिवडणुकीत जागा राखली असती

‘महाराष्ट्र बंद’चे निवेदन राष्ट्रवादीच्या एका गटाने उपविभागीय अधिकारी यांना, तर दुसऱ्या गटाने तहसीलदारांना दिले. पदाधिकारी बदलणे व बदलेल्या पदाधिकारी आक्षेप घेणे, आक्षेप घेतल्यानंतर जुनी कार्यकारणी बरखास्त करणे यासाठी एवढी ताकद तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पोटनिवडणुकीत लावली असती तर कदाचित ती जागा आपल्याच ताब्यात राहिली असती, अशी खंत नाव न छापण्याच्या अटीवर एका पदाधिकाऱ्याने ‘सरकारनामा’शी व्यक्त केली.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पाहता सध्या काँग्रेसनेदेखील आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना जवळ घेत पक्षाची मोट बांधण्याचे प्रयत्न जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सुरू केले आहेत. भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनीदेखील आपली वाटचाल शांतपणे सुरू ठेवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीतील कोण हाताला लागते का, याची चाचपणी काँग्रेसच्या नेत्यांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे भाजपच्या नेत्यांकडूनही राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. आगामी काळात राष्ट्रवादीतील नाराज या दोन्ही पक्षाच्या गळाला लागतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

Related Stories

No stories found.