बाळासाहेब थोरात म्हणाले, शेतकऱ्यांसमोर अहंकारी केंद्र सरकार झुकले...

अखेर केंद्रातील भाजप ( BJP ) सरकारने नवीन तीन कृषी विषयक कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला.
बाळासाहेब थोरात म्हणाले, शेतकऱ्यांसमोर अहंकारी केंद्र सरकार झुकले...
Revenue Minister Balasaheb Thorat Sarkarnama

संगमनेर ( अहमदनगर ) : केंद्र सरकारच्या नवीन कृषी विषयक कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. त्यासाठी आंदोलनही उभे केले होते. अखेर केंद्रातील भाजप सरकारने नवीन तीन कृषी विषयक कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावर विरोधी पक्षांतील नेत्यांकडून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. Balasaheb Thorat said, the arrogant central government bowed before the farmers ...

या संदर्भात प्रतिक्रिया देताना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. थोरात म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाशवी बहुमताच्या जोरावर संमत केलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. गेल्या एक वर्षापासून ऊन, पाऊस आणि हाडे गोठवणाऱ्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांच्या लढ्याचा विजय आहे.

Revenue Minister Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, ते खोल नैराश्यात गेले आहेत...

ते पुढे म्हणाले, की शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खलिस्तानी, देशद्रोही, नक्षलवादी, म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर खिळे ठोकून, बॅरिकेड उभारुन त्यांना अडविले गेले. शेकडोंना आपल्या जीवाचे मोल द्यावे लागले तर उन्मत्त भक्तांनी काहींना गाडीखाली चिरडून मारले. या अत्याचारांची जबाबदारी घेत मोदी सरकारला अन्नदात्याची माफी मागावी लागेल.

जाती धर्माचे राजकारण करुन फार काळ जनतेला फसवता येणार नाही हा भ्रम तुटल्यानंतर भाजपाने आज शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. कुटील राजकारणी म्हणून भाजप पूर्वीपासून प्रसिध्द आहे. हा लढा काँग्रेस पक्षाचा नाही तर भाजपा विरुद्ध जनता असा असल्याचे त्यांनी सांगितले.

Revenue Minister Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेसला पुन्हा सोनियाचे दिवस येतील 

या कायद्याबाबत काँग्रेसने जनतेत घडवलेली चर्चा व परिसंवादातून देशभरातून या कायद्याविरोधात आवाज उठवण्यात आला. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने सुरवातीपासून पाठिंबा दिला. सोनिया व राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर आंदोलने केली. मोदी सरकारला हे तीन काळे कायदे मागे घ्यावेच लागतील अशी परखड भूमिका राहुल गांधी यांनी घेतली. आज त्यांचे शब्द पुन्हा खरे ठरले, मोदींना बळीराजाच्या मागण्यांपुढे झुकावे लागले.

आजचा निर्णय आधीच घेतला असता तर बळीराजाचे नाहक बळी गेले नसते. लढाई किती तीव्रतेने, संयम आणि जिद्दीने करावी याचे उदाहरण पंजाब व हरियाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर दाखवून दिले आहे. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली होती. या विषयावर ते आत्ता बोलायलाही तयार नाहीत. हे आंदोलन सगळ्या जगाने पाहिल्याने भाजपाची जगात नाचक्की झाली आहे. हजारो कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कारखानदारांसाठी ते कायदे केल्याने, त्यांना विरोध होणे योग्य होते असे ते म्हणाले.

तसेच कामगारांसाठी मोठ्या चळवळी आणि तीव्र संघर्षातून निर्माण केलेले कायदेही मागे घेण्याची आवश्यकता आहे. हे कायदे कामगारांचे नाही तर धनदांडग्या कारखानदारांच्या हिताचे आहेत. जुलमी ब्रिटीश सरकारने केलेले जालियनवाला बाग हत्याकांड, हजारो क्रांतिकारकांनी दिलेले बलिदान यातून मिळालेल्या स्वातंत्र्याला भीक म्हणणाऱ्या नतद्रष्टांना संरक्षण देण्याचा चुकीचा पायंडा भाजपाने पाडला आहे. त्यांना सर्वोच्च पुरस्कार मिळतात ही शोकांतिका आहे. या निर्णयामुळे कितीही मोठ्या अहंकारी शासनाला जनता झुकवू शकते, शेतकरी एकजुटीचा हा विजय आहे परंतु शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहील असे थोरात म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in