
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गट केवळ अस्तित्वाला शिल्लक असताना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला त्यांचे दोन बडे नेते हिसका दाखवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी हे दोन जिल्हाप्रमुख वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे विजय देवणे व मुरलीधर जाधव हे दोघेही पदाधिकारी निवडीवरून नाराज असल्याने ते नॉट रिचेबल आहेत. (Latest Marathi News)
दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी निवड नव्याने जाहीर करण्यात आली. या पदाधिकारी निवडीत ग्रामीणचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना हटवून त्या ठिकाणी सुनील शिंत्रे यांच्याकडे जिल्हाप्रमुखपद देण्यात आले. यापूर्वी संजय पवार, मुरलीधर जाधव आणि विजय देवणे हे जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत होते. नव्या आदेशानुसार पवार आणि जाधव यांचे जिल्हाप्रमुखपद कायम ठेवून विजय देवणे यांना पदावरून हटवले आहे. तर हाजी असलम सय्यद यांची शाहुवाडी, हातकणंगले, इचलकरंजी शिरोळ या विधानसभा मतदारसंघात सहसंपर्क म्हणून निवड करण्यात आली आहे.
या पदाधिकारी नियुक्तीवरून कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली आहे. कोणालाही विश्वासात न घेता, या निवडी पक्षप्रमुखांनी कशा काय घेतल्या ? असा सवाल आता या जिल्हाप्रमुखांकडून होत आहे. चार महिन्यांपूर्वी आलेल्या उपऱ्या व्यक्तीला आमच्यावरती आणून बसविणे, हे निष्ठावंतांना डावलत असल्याचे उदाहरण असल्याचं काहींनी बोलून दाखवले आहे.
झालेली पदाधिकारी निवड ही आम्हाला विश्वासात न घेता केल्या असून ती मान्य नाही. तशी नाराजी आम्ही पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवले आहे. त्यावर त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा, अशी विनंती एका जिल्हाप्रमुखांनी केली आहे. तर दुसरे जिल्हाप्रमुख हे दोन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत.
शिवसेना फुटीनंतर निष्ठावंत जिल्हाप्रमुख म्हणून या दोघांची ओळख होती. कोणत्याही आंदोलनात ते प्रशासनाला अंगावर घेऊन काम करत होते. शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरावर बेधडकपणे मोर्चा काढणारे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव नाराज आहेत. आंदोलनावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर ठाकरेंसाठी आमच्या अंगावर केसेस ही घेतल्या आहेत. पण आम्हाला डावलून अशा पद्धतीची निवड चुकीचे असल्याचे मत एका जिल्हाप्रमुखांनी व्यक्त केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.