...त्यामुळे सोलापूरची सत्ता नको त्या माणसाच्या हातात गेली : शरद पवार

भाजपच्या विरोधात सोलापुरात सर्व पक्षांना एकत्र करणार
...त्यामुळे सोलापूरची सत्ता नको त्या माणसाच्या हातात गेली : शरद पवार
Sharad PawarSarkarnama

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या यापूर्वीच्या निवडणुकीत आम्ही जास्त लक्ष घातले नव्हते, त्यामुळे सोलापूर शहराची सत्ता नको त्या माणसाच्या हातात गेली. सोलापूर शहराचा चेहरा-मोहरा आपल्याला बदलायचा आहे. त्यासाठी भाजपविरोधी पक्षाची एकजूट करण्याची आमची तयारी आहे. सन्मानाने ही एकजूट झाली ठीक; नाही तर स्वबळावर निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले. (All parties in Solapur against BJP Will unite : Sharad Pawar)

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, पन्नास टक्के जागा महिलांसाठी आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी महिलांनी तयारी करावी. यंदाच्या निवडणुकीत अनुभवी व्यक्तींसोबतच तरुणांनाही संधी दिली जाईल. सोलापूर शहरात नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सध्या असलेले सोलापूरचे चित्र आपल्याला बदलायचे आहे. एकेकाळी उद्योगाचे शहर म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहरात पुन्हा उद्योग आणायचे आहेत. सोलापूरला जुने दिवस आणून द्यायचे आहेत.

Sharad Pawar
'सत्ता जाऊन जाणार कोठे, हे माहीत होते.... म्हणूनच मी ठाकरेंचा हात वर केला!'

सोलापूकरांच्या कष्टाचा सन्मान केला जाईल

पुणे परिसरातील हिंजवडीमध्ये आयटी पार्क होऊ शकतो, मग सोलापुरात आयटी पार्क का होऊ शकत नाही? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. मी मुख्यमंत्री असताना हिंजवडीत साखर कारखान्याच्या भूमिपूजनासाठी गेलो होतो. त्यावेळी तेथील लोकांना सांगितले. येथे हा साखर कारखाना होणार नाही. येथे दुसरेच कारखाने होतील. हिंजवडीपासून तीन किलोमीटर लांब हा कारखाना होईल, असे त्यांना त्यावेळी सांगितल्याची आठवणही पवार यांनी सांगितली. सोलापूरकर कष्ट करतात, त्यांच्या कष्टाचा सन्मान केला पाहिजे. या कष्टाला संधी देऊन त्यांचा सन्मान केला जाईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

Sharad Pawar
शरद पवारांनी सोलापुरात मित्रालाच दिला जोरदार धक्का!

पालकमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले की, सोलापूर शहराच्या बायपासचा प्रश्‍न प्राधान्याने सोडविला जाईल. येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा सोलापुरात बोलवून त्यांच्या हस्तेच या कामाचे भूमिपूजन केले जाईल. राज्याचा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री म्हणून ही माझी जबाबदारी आहे.

आम्ही कोठेही असलो तरीही आमच्या परिवाराला पवार यांनी नेहमीच सन्मानाची वागणूक दिली आहे. सोलापुरात आयटी पार्क, ऍटोमोबाईल क्‍लस्टर आवश्‍यक आहे. सोलापूर शहराला उड्डाणपूलापेक्षा सध्या बायपास रोडची तातडीने गरज आहे, अशी मागणी माजी महापौर महेश कोठे यांनी या वेळी बोलताना केली.

या प्रसंगी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष ऍड. अहमदखान पठाण, निरीक्षक सुरेश घुले, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, नगरसेवक तौफिक शेख, राष्ट्रवादीचे नगरसेवक किसन जाधव, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.