
पिंपरी - पहाटे उठून सकाळी लवकर कामाला लागतात, अशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांची कामाची पद्धत आहे. तशी त्यांची ख्यातीच आहे. त्यामुळे सकाळी लवकर होणाऱ्या कार्यक्रमांच्या तयारीसाठी प्रशासनाची धावपळ उडते. पहाटेच ते कामाला लागते. तसेच उद्या पिंपरी-चिंचवडमध्ये घडणार आहे. कारण सकाळी साडेसात वाजल्यापासूनच शहरातील विविध विकासकामांची भूमीपूजने आणि उदघाटनाची राळ आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा उडवून देणार आहेत. त्यानंतर मावळात असे त्यांचे उद्याचे भरगच्च शेड्यूल आहे. ( Ajit Dad put the office bearers to work in the morning )
दरम्यान, विकासकामांच्या उद्याच्या भुमीपूजन व उदघाटनावरून पालिकेतील मावळते सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये श्रेयवाद रंगण्याची दाट शक्यता आहे. कारण गेल्या पाच वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांच्या भुमीपूजन व उदघाटनावरून या दोन्ही पक्षांत अनेकदा वाद झडले आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांना या कार्यक्रमांना बोलवावे, असा राष्ट्रवादीचा आग्रह होता. तर, तो डावलून भाजप ते करीत होती. आता पालिकेत प्रशासकीय कारभार असल्याने हे कार्यक्रम अजितदादांच्या हस्ते घेण्याची नामी संधी राष्ट्रवादीला मिळाली आहे. मात्र,त्यावरून आमच्या कार्यकाळात मंजूर व पूर्ण झालेल्या कामांचे श्रेय राष्ट्रवादीने घेतला, असा आरोप भाजप करण्याची शक्यता आहे.
सकाळी साडेसात वाजता पिंपरी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्ष (सीएसआर) सेलच्या उद्घाटनाने या लोकापर्ण सोहळ्याची सुरवात होणार आहे. खासगी संस्था आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नव्या योजना कल्पना तसेच कार्यक्रमाच्या माध्यमातून शहराच्या शाश्वत विकासात अधिकाधिक भर घालण्याच्या उद्देशाने हा सेल सुरु करण्यात आले आहे.त्यानंतर पालिकेच्या समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा ऑनलाईन कार्यप्रणालीचा शुभारंभ ते करणार आहेत. त्यात महिला व बालकल्याण योजना,मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग आणि इतर कल्याणकारी योजनांचा समावेश आहे.
शहराची वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी मोटार सायकल हे प्रभावी माध्यम आहे. पोलीस पेट्रोलिंगसाठी अशा 50 स्मार्ट मोटार सायकल्स हस्तांतरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी 50 लाख 96 हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. पालिका क्षेत्रातील अरुंद रस्ते, मार्केट परिसर, दाटीवाटीच्या गल्लीबोळांच्या ठिकाणी तातडीने सहजपणे पोहोचून अधिक प्रभावी अग्निशमन सेवा देण्यासाठी फायटर मोटार सायकल्स अत्यंत उपयोगी आहेत. अशा 6 फायटर मोटार सायकल्सचे वाटप अग्निशमन विभागाला यावेळी करण्यात येणार आहे. या मोटर सायकल्स खरेदीकामी 80 लाख 88 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.कासारवाडी येथील सी.एम.ई. चे आर्मी रोईंग नोड, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग यांच्यामार्फत पालिका क्षेत्रातील खेळाडूंना रोईंग प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे मनपा परिसरातील राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन तसेच पाहणी सकाळी साडेआठ वाजताअजितदादा आहेत. भोसरीमधून आळंदीकडे जाणारा मुख्य रस्ता बाजारपेठेतून जात असल्यामुळे त्याठिकाणी वाहनांना पार्किंग नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या समस्येवर मात करण्यासाठी प्रभाग क्रमांक 5 मध्ये सखुबाई गवाजी गवळी उद्यानात पालिकेच्या वतीने बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन सकाळी सव्वानऊ वाजता वाजता करण्यात येणार आहे. 14 हजार सहाशे बत्तीस चौरस मीटर जागेत उभारण्यात येणाऱ्या या वाहनतळासाठी 7 कोटी 87 लाख 63 हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. हॉकी खेळाचा प्रचार, प्रसार आणि विकास करण्याच्या उद्देशाने नेहरूनगर येथे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम याठिकाणी पिंपरी चिंचवड आंतराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्रामार्फत हॉकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.पालिकेच्या या हॉकी अॅकॅडमीचे उद्घाटन सकाळी पावणेदहा वाजता होणार आहे. तदनंतर उपमुख्यमंत्री पवार सकाळी सव्वादहा वाजता चिखली येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन तेथील पाहणी करणार आहेत.
दरम्यान, त्याची पाहणी भाजपचे शहर कारभारी भोसरीचे आमदार महेश लांडगे व इतर भाजपच्या पालिकेतील माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आजच केली. तसेच भाजपची राज्यात सत्ता असताना शहरासाठी मंजूर झालेल्या वाढीव पाणीसाठ्याच्या शुद्धीकरणासाठी पालिकेत भाजपची सत्ता असताना हा प्रकल्प सुरु करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
तळवडे गायरान येथे मातीचे पाथवे तयार करण्यात आले आहेत. येथे 2 हजार दोनशे मीटर लांबीचे जॉगिंग ट्रॅक, नागरिकांना बसण्यासाठी कट्टे, लँडस्केपिंग, हॉर्टीकल्चरल विषयक कामे करण्यात आली आहेत. तसेच उद्यान विकसित करण्यात आले आहे. एक एकरमध्ये विकसित करण्यात आलेल्या या उद्यानात 300 मीटर लांबीचे जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी, लँडस्केपिंग, हॉर्टीकल्चरल विषयक कामे करण्यात आली आहेत. हे उद्यान विकसित करण्यासाठी तसेच इतर अनेक अनुषंगिक कामे करण्यासाठी 1 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.
नव्याने विकसित करण्यात आलेल्या या उद्यानाचे लोकार्पण सकाळी 10.40 वाजता करण्यात येणार आहे. भक्तिशक्ती चौक ते त्रिवेणीनगर चौकापर्यंत इको ट्रॅक तयार करण्यात येणार आहे या जॉगिंग ट्रॅकच्या कडेने विद्युत पोल उभारून तसेच वृक्षारोपण करून तो सुशोभित करण्यात येणार आहे. या ठिकाणी ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी, लँडस्केपिंगची कामे करण्यात येणार आहेत. 6 ते 8 मीटर रुंदीचे आणि 1 हजार 100 मीटर लांबीचे मातीचे ट्रॅक तयार करण्यासाठी 90 लाख 27 हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन सकाळी 11.10 वाजता करण्यात येणार आहे.
थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर अॅकॅडमीच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन सकाळी 11.40 वाजता तर वाकड येथील कै. तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानाचे लोकार्पण दुपारी 1 वाजता करण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपळे सौदागर येथे खेळाचे मैदान विकसित करण्यात आले आहे. या कामासाठी 5 कोटी 54 लाख 19 हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.
कुणाल आयकॉन रोडवरील उभारण्यात आलेल्या या अखिल भारतीय कबड्डी पंच स्वर्गीय बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचे लोकार्पण दुपारी 1.20 वाजता होणार आहे. 4 मेगापिक्सेलचे 7 हजार 600 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे शहरातील आठही प्रभागात बसवणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. नागरिक विशेष करून महिला आणि लहान मुले यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शहरात ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही. बसविण्यात येत आहेत.त्याकरिता 178 कोटी 57 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या यंत्रणेचे तसेच वरील सर्व कार्यक्रमांचे उद्घाटन, भूमिपूजनाचा भरगच्च कार्यक्रम उद्या होणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.