गडकरींच्या सत्काराला पडळकर, बाबरांची दांडी; संजयकाकांबरोबरच्या मतभेदाची चर्चा

खासदार पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. वैभव पाटील यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे पाटील यांनी गडकरी आणि संजयकाकांच्या कामाचे जाहीर कौतुक केले.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

आटपाडी (जि. सांगली) : खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी आयोजित केलेल्या केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या सत्कार सोहळ्याला खानापूरचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlkar) हे गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीची चर्चा कार्यक्रस्थळी रंगली होती. गेल्या काही दिवसांपासून संजय पाटील यांचे या दोघांशी मतभेद वाढले आहेत. मात्र, याच कार्यक्रमात खासदार पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. वैभव पाटील यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे पाटील यांनी गडकरी आणि संजयकाकांच्या कामाचे जाहीर कौतुक केले. आपण वेगळ्या पक्षात असल्याने ‘तुम्हाला मत देता येईल का माहीत नाही,’ असे सांगून लगेच ‘यू टर्न’ही घेतला. (Absence of Gopichand Padalkar and Anil Babar at Nitin Gadkari's felicitation)

नितीन गडकरी यांच्या सत्कार सोहळ्याचे भिवघाट (ता. आटपाडी) येथे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सर्वपक्षीय होता, त्यामुळे राष्ट्रवादीचे ॲड. वैभव पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप, राजाराम गरुड, प्रकाश जमदाडे आदी प्रमुख उपस्थित होते. खासदार संजय पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून विस्तवही जात नाही. गेल्या काही दिवसांपासून आमदार अनिल बाबर यांच्याशीही मतभेद वाढत चालले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमास पडळकर-बाबर उपस्थित राहणार का, याची उत्सुकता होती. मात्र, अपेक्षेनुसार दोघांनी कार्यक्रमाला दांडी मारली. त्यांची अनुपस्थिती ही प्रकर्षाने जाणवत होती.

Nitin Gadkari
राजू शेट्टींनी स्वतःसाठी पवारांकडे कॅबिनेट मंत्रिपद मागितल्याचा देवेंद्र भुयारांचा गौप्यस्फोट

गडकरी आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे कटाक्ष टाकत आणि नाव न घेता खासदार संजय पाटील यांनी भाषणातून आपल्या मनातील खदखद मांडली. लोकांच्या कामासाठी भांडणं हा माझा स्वभाव आहे, त्यामुळेच काहींनी भाजप सोडून जाणार असल्याच्या बातम्या पेरल्या आहेत. पण, साहेब मी तुमचा चेला आहे. तुम्ही मागे असताना मला मागे बघायची गरजच नाही. अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शी कारभार केला आहे. एकाही ठेकेदाराकडून एक रुपयाही मी खाल्लेला नाही, असे वारंवार सांगून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाचे खंडन केले. तसेच, मी कधीच नारळ फोडला नाही. मात्र, काही मंडळी गाडीत नारळाचं पोतं टाकून कुणाचं काम आहे हे न पाहता रोज दहा ते वीस नारळ फोडत असल्याची टीकाही केली.

Nitin Gadkari
Video: चांगल्याला चांगलं नाही म्हटलं तर पडळकर ‘प्रॉब्लेम’ तयार होतो: जयंत पाटलांचा टोला

राष्ट्रवादीच्या वैभव पाटलांचा ‘यू टर्न’

राष्ट्रवादीचे वैभव पाटील म्हणाले की, काहीजणांचा मीच सारी कामे करतो. माझ्याशिवाय काहीच होत नाही असा समज आहे. पण प्रत्यक्षात तसं नाही. हा कार्यक्रम त्यांच्या मतदारसंघात होऊ नये, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळेच त्यांची खळखळ चालली होती. गडकरी आणि संजयकाकांचे काम खरोखरच चांगले असून त्यांना पुढच्या वाटचालीस जाहीर शुभेच्छा देतो. पण, मी राष्ट्रवादीत आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना सांगून कार्यक्रमाला आलो आहे. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत मात्र, मला तुम्हाला मत देता येईल का माहीत नसल्याचे सांगत लगेच ‘यू टर्न’ घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com