कोल्हापूरमधील पाटील-महाडिक हायव्होल्टेज मॅच बिनविरोध होणार?

कोल्हापूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्राही असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
कोल्हापूरमधील पाटील-महाडिक हायव्होल्टेज मॅच बिनविरोध होणार?
Satej Patil Vs Amal Mahadik Sarkarnama

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ६ जागा बिनविरोध करण्यासाठी सध्या धावाधाव सुरु आहे. भाजपने संजय केनेकर यांचा अर्ज माघारी घेवून काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांची पोटनिवडणूक बिनविरोध केली. त्यानंतर काँग्रेसनेही मुंबईतील अपक्ष संजय कोपरकर यांचा अर्ज माघारी घेत मुंबईच्या २ जागा बिनविरोध केल्या. त्यामुळे आता उर्वरित ४ जागांवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे कळतयं. विषेश म्हणजे यात कोल्हापूरच्या हायव्होल्टेज जागेचाही समावेश आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज संध्याकाळपर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसकडून भाजपला प्रस्ताव गेल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या प्रस्तावावर सविस्तर चर्चा केली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस-काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातही बैठका सुरू आहेत. या प्रस्तावानुसार भाजपला ३ जागा, प्रज्ञा सातव यांच्यासह काँग्रेसला २ आणि शिवसेनेला २ जागा असे सूत्र ठरण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

यात प्रज्ञा सातव आणि मुंबईमधील २ अशा एकूण ३ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ४ जागा बिनविरोध होणार का अशा चर्चा सुरु आहेत. नागपूरबाबत भाजप आग्रही असून कोल्हापूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्राही असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे याठिकाणी भाजप उमेदवार अमल महाडिक यांनी अर्ज माघारी घेतल्यास सतेज पाटील यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास राजकीय घोडेबाजाराला लगाम बसणार आहे.

कुठे कोण उमेदवार आणि कोण होणार बिनविरोध

धुळे-नंदूरबारमध्ये भाजपचे अमरिश पटेल आणि काँग्रेसचे गौरव वाणी उभे आहेत. याठिकाणी अमरिश पटेल बिनविरोध होण्याची शक्यता आहे. अकोला-बुलडाणा-वाशिममध्ये शिवसेनेचे गोपिकिशन बजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल उमेदवार आहेत. हि जागा शिवसेनेला बिनविरोध जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसतचे छोटू भोयर उभे आहेत. नागपूरच्या जागेसाठी भाजप आग्रही असल्याचे कळते आहे. तर महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे सतेज पाटील आणि भाजपचे अमल महाडिक आमनेसामने आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in