एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मुंडेंचा पाठिंबा ; मुख्यमंत्र्यांना लिहले पत्र..

अशा प्रकारे दडपशाही वृत्तीने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यापासून रोखले जात असेल तर ते आणखी घातक ठरेल. (Dhnanjay Munde)
Mpsc-Dhnanjay Munde News
Mpsc-Dhnanjay Munde NewsSarkarnama

मुंबई : राज्य सेवा मुख्य परीक्षांमध्ये चंद्रकांत दळवी समितीने केलेल्या शिफारशीनुसार जे बदल केले त्यावरून मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. (Mpsc) त्यांना पोलिसांकरवी नोटिसा देऊन आंदोलन मागे घेण्यास भाग पाडण्यात आले, या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे आहोत, असे माजीमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा भारतीय राज्य घटनेने दिलेला अधिकार व आयुध आहे, या देशाने अनेक यशस्वी आंदोलने पाहिली आहेत. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना नोटीसा देऊन, कार्यवाहीची व ब्लॅकलिस्ट करण्याची भीती दाखवून आंदोलन करण्यापासून रोखणे हे घटना विरोधी आहे. (Maharashtra) राज्य लोकसेवा आयोगाने उलट आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून त्यावर मार्ग काढणे अपेक्षित आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

या विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय राज्य सरकारने मध्यस्ती करून दूर करावा अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंडे यांनी लिहिले आहे. पुणे पोलीस आणि राज्यातील इतर पोलिसांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमाला विरोध करण्यासाठी आंदोलन पुकारणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थी आंदोलकांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ नुसार नोटिसा देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अशा प्रकारे आंदोलन करणे म्हणजे आयोगावर दबाव आणण्यासारखे असून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. कोणत्याही आंदोलनात सहभागी झाल्यास आयोग त्यांना ब्लॅकलिस्ट करेल, अशा प्रकारची भीती पसरवली जात असल्याचे धनंजय मुंडे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Mpsc-Dhnanjay Munde News
मंत्रिमंडळ विस्तारास विलंब : मातब्बरांना डावलण्याची शिंदे-फडणवीसांची खेळी?

वास्तविक पाहता भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) नुसार नागरिकांना व्यक्तिस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार असून कलम १९ (१) (ब) नुसार एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. आंदोलन करण्याबाबत राज्य शासनाची नियमावली देखील आपल्याला माहीत असल्याचे मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे.

आयोगाने परीक्षेत केलेले बदल, विद्यार्थ्यांच्या मागण्या यासंदर्भात एकत्र बैठक घेऊन राज्य सरकारने विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा, अशी विनंती शिंदे सरकारला या आधीही एका पत्राद्वारे केली होती, मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यातच सोमवारी पुणे व अन्य ठिकाणी काही परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी कलम 149 अंतर्गत विद्यार्थ्यांना नोटिसा देत आंदोलन स्थगित करण्यास भाग पाडले.

सरसकट आंदोलनकर्त्याना नोटिसा बजावून पोलिसी धाक निर्माण करत आंदोलन दडपण्याची कृती समर्थनीय ठरू शकत नाही. तसेच, परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे आंदोलन हे मागणी मंजूर करून घेण्यासाठी दबाव निर्माण करणारे राज्य घटनेने दिलेले आयुध आहे आणि याचा वापर सर्वच घटकांनी अनेकदा केला आहे. त्यामुळे आयोगावर काही योग्य घडण्यासाठी दबाव निर्माण होत असेल तर त्याचा बाऊ करण्याऐवजी, संबंधितांना कारवाईचा इशारा देण्याऐवजी आयोगाने स्वागत केले पाहिजे.

Mpsc-Dhnanjay Munde News
बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे, तुम्ही त्यांच्या पोटी आलात म्हणजे राजा झालात का ?

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, आयोगाचीही बाजू समजावून सांगितली पाहिजे. ही भूमिका स्वतंत्र भारतातील, स्वायत्त लोकसेवा आयोगाकडून अपेक्षित असल्याचे मुंडे म्हणाले. कोरोना आणि अन्य काही कारणांमुळे एमपीएससी मुख्य परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे अगोदरच उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. बदललेल्या परीक्षा पद्धतीसंदर्भातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यासंदर्भात सर्व संबंधितांची एकत्रित बैठक घेऊन सुवर्णमध्य साधणारा निर्णय घ्यावा.

त्यातच जर अशा प्रकारे दडपशाही वृत्तीने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यापासून रोखले जात असेल तर ते आणखी घातक ठरेल. त्यामुळे लोकशाही मार्गाने, नियमांचे पालन करून शांततापूर्ण आंदोलनांना अटकाव घालू नये आणि लोकसेवा आयोगानेही उमेदवारांचे म्हणणे ऐकून घ्यावे. सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे अशी मागणी मी लोकसेवा आयोग आणि पोलीस दलाकडे देखील करीत असल्याचे मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान एकीकडे मुख्य परिक्षेसंदर्भात निर्माण झालेला पेच, आयोगाची दडपशाही त्यात आपले म्हणणे मांडायची देखील पंचाईत यामध्ये ग्रामीण भागातून येऊन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मोठा खर्च करून परीक्षेची तयारी परीक्षार्थी नैराश्याच्या गर्तेत जाण्याची भीती देखील काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यात धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांची बाजू लावून धरल्याने अनेकांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in