तुम्ही जितेशला निवडून द्या, अंतापूरकरांनी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करतो

(Guardian Minister Ashok Chavan)अंतापूरकर परिवाराचे अश्रू हे भावनिक आहेत, (By-Election)पण विरोधक मगरमच्छचे अश्रू ढाळून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तुम्ही जितेशला निवडून द्या, अंतापूरकरांनी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करतो
Ashok Chavan-Jitesh AntapurkarSarkarnama

देगलूर ः किमान समान कार्यक्रमानुसार आम्ही तीन पक्ष एकत्र येऊन राज्यात आघाडी सरकार स्थापन केले. जेथे कुठे दुर्देवाने अशा घटना घडतील, त्या ठिकाणची जागा त्याच पक्षाच्या वाट्याला देण्याचे त्यावेळी ठरले. त्याप्रमाणे ही जागा काँग्रेसला आली. सर्वांच्या सहमतीने आम्ही उमेदवार दिला. यामध्ये मी कुठे एकाधिकारशाही केली, हे मला तरी कळालेले नाही.

‘नांदेड माझे, मी नांदेडचा’या धोरणाने आजपर्यंत माझी वाटचाल राहिली असून एकमेकांना शिव्याशाप देण्याने विकास होत नसतो, तो माझा अजेंडाही नाही, अशा शब्दात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधकांचा समाचार घेतला. काँग्रेसचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरण्यात आला. त्यानंतर सिद्धेश्वर मंगल कार्यालयात सभा घेण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार ,ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम, माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, आमदार शामसुंदर शिंदे, भुजंग पाटील, शीतलताई अंतापूरकर, उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी आमदार तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

अंतापूरकर परिवाराचे अश्रू हे भावनिक आहेत, पण विरोधक मगरमच्छचे अश्रू ढाळून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची जोरदार टीका चव्हाण यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच केली. मतदारांनी हे ओळखून जितेशच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन करतांनाच या मतदारसंघाचे पालकत्व मी घेण्यास तयार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

अंतापूरकर परिवाराला काँग्रेस पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही. याची हमी मी त्याचवेळी त्यांना दिली होती. अंतापूरकर यांच्या निधनानंतर या मतदारसंघात शंभर कोटीची कामे मंजूर केली आहेत. भविष्यात अंतापूरकरानी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करण्याची ग्वाही आपणाला देतो, असेही चव्हाण म्हणाले. देश भांडवलशाहीच्या घशात घालू पाहणाऱ्या सत्तापिपासू भाजपाला या पोटनिवडणुकीत गाडण्यासाठी येथील राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता तनमनधनाने आघाडी सोबत राहील, अशी हमी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कदम यांनी दिली.

Ashok Chavan-Jitesh Antapurkar
मंदिरे खुली होताच, राजकीय नेत्यांचा देवाकडे धावा

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in