ईडीच्या कारवाईनंतर दानवे-खोतकर संघर्ष भडकणार?

अर्जून खोतकर यांनी सोमय्या यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देतांना खेळाला सुरूवात रावसाहेब दानवेंनी केली आहे, शेवट मात्र मी करणार, असा निर्वाणीचा इशारा दिला. (Raosaheb Danve- Arjun Khotkar)
Danve-Khotkar
Danve-KhotkarSarkarnama

जालना ः शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर जालना सहकारी साखर कारखाना खरेदीत शंभर कोटींचा घोटाळा आणि एक हजार कोटींची जमीन हडपण्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पंधरा दिवसांपुर्वी केला होता. त्यानंतर आठवडाभरातच ईडीच्या (Ed) पथकाने जालना कृषी उत्पन्न बाजार समिती व खोतकर यांच्या बंगल्यावर छापा टाकत झाडाझडती केली होती.

या कारवाईतून ईडीच्या हाती काय लागले हे अद्याप गुलदसत्यात असले तरी जिल्ह्यात केंद्रीय रेल्वे राज्यममंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध अर्जून खोतकर असा राजकीय संघर्ष भडकण्याची दाट शक्यता आहे. किरीट सोमय्या यांनी काल जालन्यात पत्रकार परिषद घेऊन अर्जून खोतकरांवरील आरोपांचा पुनरुच्चार केला. अर्थात सोमय्या यांना यावेळी शिवसैनिकांच्या असंतोषाला देखील तोंड द्यावे लागले.

शेकडो शिवसैनिकांनी सोमय्या यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत भविष्यात घडणाऱ्या संघर्षाची जाणीव करून दिली. एवढेच नाही तर अर्जून खोतकर यांनी सोमय्या यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देतांना खेळाला सुरूवात रावसाहेब दानवेंनी केली आहे, शेवट मात्र मी करणार, असा निर्वाणीचा इशारा दिला. त्यामुळे येणाऱ्या काळात दानवे विरुध्द खोतकर पर्यायाने जिल्ह्यात शिवसेना-भाजप एकमेकांना भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दानवेंविरुद्ध लढण्याची खोतकरांनी तयारी केली तेव्हापासूनच या दोघांमध्ये संघर्षाची थिणगी पडली होती. पण आपल्या चकवा पद्धतीच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या दानवेंनी तेव्हा सबुरीने घेत आपल्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग सुकर करून घेतला. खोतकरांनी माघार घेतल्यानंतर तुम्ही मनापासून माझे काम करा, मी त्यापेक्षा जास्त ताकदीने तुम्हाला विधानसभेला निवडून आणील, असा दावा दानवे यानी भीमादेवी थाटात केला होता.

पण विधानसभेला नेमकं उलंट घडलं, खोतकरांचा पराभव झाला. रावसाहेब दानवेंनी आपला करेक्ट कार्यक्रम केल्याची जाणीव खोतकरांना झाली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान, पारध रस्ता, जालन्यातील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमांना डावलणे अशा अनेक प्रकरणांवरून खोतकर-दानवे यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्या. पण मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात दानवेंना केंद्रात रेल्वेसारखे महत्वाचे खाते मिळाले आणि त्यांची गाडी सुसाट सुटली. तर खोतकर हे पुनर्वसनाच्या अजूनही प्रतिक्षेत आहेत.

मध्यंतरी अवैध वाळू वाहतूक प्रकरणात जाफ्राबाद तालुक्यात एका पत्रकारावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला चढवला होता. यावरून पोलिसांनी रावसाहेब दानवे यांच्या संपर्क कार्यालयाची झाडाझडती घेतली होती. यामुळे संतापलेल्या दानवेंनी पोलिस अधिक्षकांना पत्र लिहून झडती घेणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यास भाग पाडले होते.

Danve-Khotkar
मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पण काही दिवस 'वर्क फ्रॉम होम'च

यात खोतकरांनी उडी घेत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याचा फायदा उचलत या पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी मिळेल तेव्हा हे दोन्ही नेते आक्रमक झाल्याचे अनेकदा पहायला मिळाले.

ईडीची पिडा दानवेंमुळेच ?

जालना सहकारी साखर कारख्यान्याचे प्रकरण तसे जुनेच. या कारखान्यावरून खोतकरांवर याआधी देखील आरोप झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी दानवे-खोतकर यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीत याच प्रकरणात तडजोड झाल्याची मोठी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात होती. पण लोकसभा निवडणुक निर्विघ्न पार पाडून घेण्यासाठी दानवे यांनी केलेली ती खेळी होती, असेही आता बोलले जात आहे. जालना सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आणि त्या संदर्भातले कागदोपत्री पुरावे भाजपकडूनच सोमय्या यांना पुरवले गेल्याचे समजते.

औरंगाबादेत जेव्हा सोमय्या यांनी खोतकरांवर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले, त्यानंतरच्या प्रतिक्रियेत खोतकरांनी थेट रावसाहेब दानवे यांचे नाव घेतले होते. काल जालन्यात देखील त्यांनी दानवे यांचे नाव घेतच त्यांनी सुरू केलेल्या खेळाचा शेवट आपण करू, असा इशारा दिला आहे. त्यामुळे कारवाईची ही ईडापिडा दानवे यांच्या कृपेनेच असल्यावर खोतकरांनी शिक्कामोर्तब केले आहे. आता या आरोप-प्रत्यारोप आणि संघर्षाला अधिक धार येणार आहे.

भाजप कार्यालयाच्या झाडाझडती प्रकरणात दानवेंच्या दबावाखाली ज्या पोलिस अधिक्षकांनी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते, त्याच विनायक देशमुख यांना काही दिवसांपुर्वी खोतकर यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध मटका व जुगारा संदर्भात पत्र पाठवून ते बंद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे संघर्षाला सुरूवात तर झाली आहे, पुढे हा संघर्ष किती टोकाला जातो हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com