औरंगाबाद लोकसभा भाजप लढवणार की शिंदे सेना ? केंद्रीय मंत्र्यांची गुगली..

आत्ताच औरंगाबाद लोकसभेच्या जागेवर दावा सांगणे चुकीचे ठरेल आणि विरोधकांना सावध होता येईल, त्यामुळे घाईघाईने कुठलीही घोषणा करण्यास भाजपचे नेते सध्या इच्छुक नाहीत. (Bjp, Aurangabad)
Cm Eknath Shinde-Bjp Cenratal Minister News, Aurangabad
Cm Eknath Shinde-Bjp Cenratal Minister News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : राज्यातील सत्तांतरानंतर भाजप आणि शिंदे सेना एकत्र आली आहे. भाजपने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करत आगामी २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये ज्या १२२ लोकसभा मतदारसंघांमध्ये (Bjp) भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता त्या मतदारसंघांवर मोदी- शहांनी लक्ष केंद्रित केले आहे.

याशिवाय युतीमुळे ज्या मतदारसंघांमध्ये भाजपला शिवसेनेची मदत करावी लागली ते मतदारसंघ आता प्रामुख्याने भाजप आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यापैकीच मराठवाड्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून (Aurangabad) औरंगाबाद लोकसभेकडे पाहिले जाते. गेल्या निवडणुकीत इथे शिवसेनेचा पराभव करून एमआयएमने ही जागा जिंकली. आता शिंदे सेनेची समजूत घालून भाजप या मतदारसंघात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचा दोन दिवसांचा झालेला औरंगाबाद दौरा पाहता भाजपने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ लढण्याची पूर्ण तयारी केली आहे असे दिसते. आतापर्यंत युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येत होता, शिवसेनेत उभी फूट पाडून शिंदे यांचीच शिवसेना खरी असा दावा करणारी भाजप लोकसभा निवडणुकीत औरंगाबादचा उमेदवार ठरवताना काय भूमिका घेणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे स्थानिक नेते व पदाधिकारी खाजगीत बोलताना औरंगाबाद लोकसभेचा पुढचा खासदार आमचाच असेल, असा दावा करत आहेत. परंतु शिंदे यांची सेना खरी शिवसेना असेल तर मग या जागेवरचा दावा शिवसेना म्हणजेच शिंदे गट सोडणार का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल केलेले विधान बरेचसे सूचक म्हणावे लागेल.

Cm Eknath Shinde-Bjp Cenratal Minister News, Aurangabad
आदित्य ठाकरेंना मोठा धक्का; वरळीतील शिवसेनेचे ५०० कार्यकर्ते शिंदे गटात दाखल

औरंगाबाद लोकसभेची जागा शिंदे गटही लढवू शकतो, अशी गुगली यादव यांनी टाकली आहे. याचाच अर्थ औरंगाबादची जागा कोणी लढवावी याबाबत अद्याप कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. एकनाथ शिंदे हे औरंगाबादची जागा भाजपला सोडतील असे गृहीत धरून किंवा भविष्यात शिंदेसेनेसोबत फाटले तर भाजपची स्वतंत्र लढण्याची तयारी असावी, या दृष्टीने देखील भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजपची जिल्ह्यात बांधणी सुरू आहे.

आत्ताच औरंगाबाद लोकसभेच्या जागेवर दावा सांगणे चुकीचे ठरेल आणि विरोधकांना सावध होता येईल, त्यामुळे घाईघाईने कुठलीही घोषणा करण्यास भाजपचे नेते सध्या इच्छुक नाहीत. २०२४ उजाडेपर्यंत जी काही राजकीय परिस्थिती असेल त्यानुसार निर्णय घेतला जाईल हेच यादव यांनी अधोरेखित केले आहे.

एकंदरीत भाजपचे देश आणि राज्य पातळीवरचे राजकारण पाहिले तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना आणि शिंदे सेना या दोघांचेही अस्तित्व नको, अशीच रणनीती भाजपकडून आखली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तूर्तास भूपेंद्र यादव यांचा औरंगाबाद दौरा हा भाजपची ताकद आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण एकट्याच्या जीवावर निवडून येऊ शकतो का? याची चाचणी करण्यासाठीच होता असे म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com